Gold Card | Donald Trump | Citizenship । USA Gold Card | काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांच्याबाबतीत कठोर पाऊल उचलले आहे. बेकायदेशीररित्या अमेरिकेत वास्तव्य करत असलेल्या नागरिकांना पुन्हा मायदेशी पाठवले जात आहे. मात्र, एकीकडे बेकायदेशीर स्थलांतरितांना परत पाठवत असताना ट्रम्प यांनी नवीन व्हिसा प्रोग्रामची घोषणा केली. ट्रम्प यांनी ‘गोल्ड कार्ड’ नावाने व्हिसा प्रोग्रामची घोषणा केली असून, या अंतर्गत आता अमेरिकेचे नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ट्रम्प यांनी ‘गोल्ड कार्ड’ला EB-5 व्हिसा प्रोग्रामचा पर्याय असल्याचे म्हटले आहे. तसेच, भविष्यात 10 लाख गोल्ड कार्डची विक्री करण्याचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सध्या अमेरिकेचे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी ‘EB-5 व्हिसा’ प्रोग्राम हा सर्वात सोपा मार्ग आहे. हा व्हिसा प्राप्त करण्यासाठी 1 मिलियन डॉलर (जवळपास 8.75 कोटी रुपये) एवढी रक्कम द्यावी लागते. मात्र, ‘गोल्ड कार्ड’ची रक्कम यापेक्षा 5 पट अधिक आहे. 5 मिलियन डॉलर (जवळपास 44 कोटी रुपये) खर्चून गोल्ड कार्ड प्राप्त करता येणार आहे. डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले? पाहा… या कार्डची घोषणा करताना ट्रम्प म्हणाले की, ‘या व्हिसा कार्डच्या माध्यमातून अमेरिकेच्या नागरिकत्व प्राप्त करण्याचा मार्ग उपलब्ध होईल. हे कार्ड खरेदी करून लोकं अमेरिकेत येतील व जास्त कर भरतील. याद्वारे राष्ट्रीय कर्ज फेडण्सास मदत होईल.’ तसेच, ही योजना यशस्वी होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. ‘या’ कार्डचा फायदा नेमका कुणाला होणार? सध्या अमेरिकेत कायमस्वरुपी वास्तव्य करण्यासाठी ‘ग्रीन कार्ड’ गरजेचे असते. यासाठी EB-1, EB-2, EB-3, EB-4 आणि EB-5 व्हिसा प्रोग्राम आहेत. अमेरिकेचे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी भारतीय प्रामुख्याने ‘EB-5’ व्हिसा प्रोग्राम असतात. त्यामुळे ट्रम्प सरकारने EB-5 व्हिसा प्रोग्राम रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास ‘गोल्ड कार्ड’साठी भारतीय नागरिकांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. त्यामुळे या नवीन व्हिसा प्रोग्रामचा सर्वाधिक फायदा श्रीमंतानाच अधिक होणार असल्याचं स्पष्टच दिसून येत आहे. ट्रम्प यांनी ही योजना का सुरु केली? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘गोल्ड कार्ड’ची योजना सुरु करताच मोठ्या प्रमाणावर याची चर्चा होऊ लागली आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार गोल्ड कार्ड योजना अशा व्यक्तींना आकर्षित करील, जे व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी निर्माण करून अमेरिकन अर्थव्यवस्थेत अर्थपूर्ण योगदान देऊ शकतात. सध्या अमेरिकेच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज असून, सरकारला साडेतीन लाख ते चार लाख कोटी अमेरिकन डॉलर्सचे कर्ज कमी करायचे आहेत. यासाठी ही योजना महत्वाची ठरणार आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात श्रीमंत व्यक्तींची संख्या वाढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. अमेरिकेत येण्याची जगभर मोठ्या प्रमाणात क्रेझ असते. त्यामुळे जागातील सर्वोत्तम श्रीमंत लोकांनी अमेरिकेत यावं. त्यामुळे अमेरिका अधिक श्रीमंत होईल आणि ते अधिक यशस्वी होईल. अशी ट्रम्प सरकारची इच्छा आहे. भारतीय गुंतवणूकदारांसाठी संधी आणि आव्हाने: भारतातील श्रीमंत आणि गुंतवणूकदार वर्गातील लोक मोठ्या प्रमाणात देश सोडून जात आहेत. अमेरिकेने अशा लोकांसाठी एक मोठा दरवाजा खुला करून दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना याचा मोठा फायदा होणार असल्याचं दिसून येत आहे. संधी:- भारतीय उद्योजक आणि उच्च-मूल्य असलेले व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊन अमेरिकन नागरिकत्व मिळवू शकतात, ज्यायोगे त्यांना अमेरिकेत व्यवसाय विस्तार आणि स्थायिक होण्याची संधी मिळेल. आव्हाने:- उच्च गुंतवणुकीची आवश्यकता आणि अमेरिकेतील कर नियमांच्या अनिश्चिततेमुळे, अनेक भारतीय गुंतवणूकदार या योजनेत सहभागी होण्यास संकोच करू शकतात. तसेच, गोल्ड कार्डच्या किंमतीमुळे जे भारतीय नागरिक अमेरिकेत स्थायी होण्याचे स्वप्न बघत आहेत, त्यांची संधी कमी होऊ शकते. ‘या’ देशात नागरिकत्व विकत मिळतं? नागरिकत्व विकत देण्याची पद्धत जगातल्या अनेक देशांत वापरली जाते. यामध्ये कॅनडा, न्यूझीलंड, पोर्तुगाल, ऑस्ट्रेलिया, पनामा, सर्विया, अँटिग्वा, सिंगापुर, मेसेडोनिया, पेरु अशा अनेक देशांचा समावेश होतो. यातच आता अमेरिकेचाही समावेश झाला आहे. या पद्धतीला ‘सिटिझन बाय इन्व्हेस्टमेंट’ असं देखील म्हंटलं जात. रशियन नागरिकांना गोल्ड कार्ड मिळणार : याविषयी बोलताना स्वतः डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “हो रशियन अब्जाधीशांनाही याचा लाभ मिळू शकतो. मी काही रशियन अब्जाधीशांना ओळखतो, ते चांगले लोक आहेत. किमान एक दशलक्ष लोकांना गोल्ड कार्ड्स दिले जाऊ शकते, आणि ते त्यांना परवडणारे असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. ग्रीन कार्ड म्हणजे काय? त्याचं काय होणार? ‘ग्रीन कार्ड’ म्हणजे अमेरिकेच्या कायमस्वरूपी रहिवासाचा (Permanent Resident) अधिकृत परवाना. अमेरिकेत राहण्यासाठी आणि तिथे काम करण्यासाठी हा परवाना अत्यंत महत्त्वाचा असतो. याचे फायदे देखील मोठ्या प्रमाणात होतात. – अमेरिका कायमस्वरूपी राहण्याची परवानगी मिळते. – अमेरिकेत कोणत्याही कायदेशीर नोकरीसाठी अर्ज करू शकता. – काही कालावधीनंतर (साधारणपणे 5 वर्षांनी) अमेरिकेचे नागरिकत्व मिळवण्याचा अर्ज करू शकता. – अनेक सरकारी सुविधा आणि सामाजिक लाभ मिळू शकतात. ‘ग्रीन कार्ड’चे तोटे काय आहेत? – ग्रीन कार्ड धारकांना मतदानाचा हक्क नसतो. – नागरिकत्व न घेतल्यास, ग्रीन कार्ड रद्द होऊ शकते – ग्रीन कार्ड धारकांना काही विशिष्ट सरकारी नोकऱ्या मिळत नाहीत. सध्या इतर देशांच्या तुलनेत अमेरिकन पासपोर्ट अधिक मजबूत आहे. कारण तो 180+ देशांसाठी व्हिसा फ्री किंवा ऑन-अरायव्हल प्रवेश देतो, तर भारतीय पासपोर्ट फक्त 60-70 देशांसाठीच मर्यादित आहे. भारतीय नागरिक अमेरिकन नागरिकत्व घेतल्यास त्यांना भारतीय पासपोर्ट सोडावा लागतो. दरम्यान, गोल्ड कार्ड आल्यानंतर ग्रीन कार्डचे काय होणार? याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती अमेरिकन सरकारकडून देण्यात आलेली नाही. ‘गोल्ड कार्ड’चे धोके काय? गुन्हेगारांसाठी पळवाट सध्या जगभरातील अनेक देश गुंतवणुकीसाठी नागरिकत्व देत आहेत. स्पेन, थायलंड, ऑस्ट्रेलिया, इटली, कॅनडा, इत्यादी.. अशा देशांचा यामध्ये समावेश आहे. 2021 मधील यु. एस. काँग्रेस रिसर्चच्या अभ्यासातून असं समोर आलं की, या व्हिजाच्या माध्यमातून श्रीमंतांचा गैर फायदा घेणार नाही ना? दिलेला पैसा चुकीच्या मार्गाने कमावलेला तर नाही? हा व्हिजा ठराविक लोकांसाठी नाही ना? अशी भीती या अहवालातून व्यक्त केली गेली होती. त्यानंतर 2023 मधील ‘आर्थिक सहकार्य आणि विकास संघटने’च्या अहवालानुसार सांगण्यात आलं की, अशा गोल्डन व्हिजामुळे थेट परदेशी गुंतवणूक येऊ शकते, पण यामुळे अब्जावधींचे घोटाळे करणाऱ्या गुन्हेगारांना आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाईमधून थेट पळवाट काढता येईल. तसेच स्थानिक नागरिकांना घर मिळणं देखील महाग होऊन बसलं होत. म्हणून यावर विचार मंथन केल्यानंतर ही योजना बंद करण्यात आली.