कशामुळे पराभव झाला ? जयंत पाटील यांनी उत्तर देत ‘या’ पक्षाला सुनावलं

Mumbai । विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आहे. या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. तर, महाविकास आघाडीचे 2 उमेदवार जिंकले असून शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पराभूत झाले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीचे मत फुटल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने हा निकाल महायुतीमधील पक्षांचा उत्साह वाढवणारा आहे.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी उभे असलेल्या 12 उमेदवारांपैकी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात नेमके कोण विजयी होणार याची उत्कंठा लागून राहिली होती. अखेर, मिलिंद नार्वेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असून शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसची 8 मते फुटल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
या पराभवानंतर पहिल्यांदाच शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,’मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला. त्यामुळे हा पराभव झाला आहे. मी आत्मचिंतन करतोय. सेंट्रल कमिटीची बैठक सुरु आहे. विजय झाला तरी आत्मचिंतन करतो, पराभूत झालो तरी आत्मचिंतन करतो. हरलो असलो, तरी पुन्हा लढू. महाराष्ट्रात याआधी अशा पद्धतीच राजकारण नव्हतं. थोड्या प्रमाणात इकडे तिकडे लोक करायचे. आजपर्यंत ज्या निवडणुका मी लढवल्या, तेव्हा अशी परिस्थिती नव्हती” असंही पाटील म्हणाले.
मीडियाने महाविकास आघाडीतील घटक पक्षांना तुम्ही मदत केली. पण तुम्हाला गरज होती, तेव्हा त्यांनी मदत केली नाही का? असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले,’मी राष्ट्रवादीच्या 12 मतांवर उभा होतो. एक मत त्यांचं फुटलं. आमची पण मत फुटली. मला चार मत मिळाली असती, तर सेकंड प्रेफरन्सची 25 ते 30 मत घेऊन निवडून आलो असतो. तेच गणित होतं.”काँग्रेसने सेकंड प्रेफरन्सची मत समान वाटली पाहिजे होती, तर निकाल बरोबर लागला असता. पण त्यांनी ठाकरे गटाला प्राधान्य दिलं,’ असं म्हणत पाटील यांनी भूमिका मांडली आहे.
जयंत पाटील मविआ सोबतच राहणार का? या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले..
“मला अभ्यास, आत्मचिंतनाची गरज आहे. मी आज जास्त बोलणार नाही. दोन-चार दिवसात बोलेन. राष्ट्रवादीच एक मत फुटलं, 11 मत बरोबर मिळाली. मी महाविकास आघाडी, शरद पवारांसोबत आहे. त्यात कुठेही बदल होणार नाही” असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसची सात मत फुटली या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘मी त्याचा अभ्यास केलेला नाही’





