अरे हे काय नवीन! करोना लसीच्या भीतीने लोकांनी घेतल्या नदीत उड्या; फोटो व्हायरल

लखनऊ : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरण करण्यात येत आहे. सरकारने तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला1 मेपासून परवानगी दिली मात्र लसींचा मोठा तुटवडा जाणवू लागला. देशात एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे आता एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. या घटनेत ग्रामीण भागातील लोकांच्या मनात लसीबाबत विविध गैरसमज असल्याने त्यांनी नदीत उड्या घेतल्याची एक विचित्र घटना घडली आहे.
गावात लस देण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी पोहोचताच गावातील लोकांनी लसीकरणापासून वाचण्यासाठी नदीत उड्या घेतल्या. यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी या लोकांना बाहेर येण्यास सांगितले, मात्र त्यांनी काहीही ऐकले नाही. यानंतर थेट उपजिल्हाधिकाऱ्यांनीच या लोकांना समजवल्यानंतर हे लोक नदीतून बाहेर आले.
ही घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी () जिल्ह्यातील सिसौडा गावातील आहे. 1500 लोकसंख्या असणाऱ्या या गावातील केवळ 14 लोकांनीच लस घेतली आहे. या गावात आरोग्य विभागाची टीम दाखल झाली. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लसीकरणाबाबत सूचना देताच गावातील लोक घाबरले आणि गावाबाहेरुन वाहाणाऱ्या सरयू नदीच्या काठी येऊन बसले.
आरोग्य विभागाचे कर्मचारी या लोकांना समजवण्यासाठी याठिकाणी गेले. मात्र, हे कर्मचारी आपल्याकडे येत असल्याचं पाहातच हे लोक प्रचंड घाबरले आणि याठिकाणाहून पळ काढण्यासाठी त्यांनी सरयू नदीत उड्या घेतल्या. लसीपासून वाचण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी समजवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र या लोकांनी ऐकलं नाही. अखेरच उपजिल्हाधिकाऱ्यांनीच या गोष्टीत हस्तक्षेप केला. राजीव शुक्ला यांनी गावातील लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. यानंतर अखेर 14 लोकांनी लस घेतली. मात्र, गावातील एकूण 1500 लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या फारच कमी आहे.




