India vs West Indies 2026 : भारताविरुद्धच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर! हेटमायरचे कमबॅक, नव्या चेहऱ्याला संधी
India vs West Indies 2026 : या मालिकेला २७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून, तिरुवनंतपुरम येथे पहिला एकदिवसीय सामना रंगणार आहे.

India vs West Indies 2026 : भारतात होणाऱ्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडिजने आपले वनडे आणि टी-२० संघ जाहीर केले आहेत. भारत दौऱ्यात वेस्ट इंडिज आणि टीम इंडिया यांच्यात तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
या मालिकेला २७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून, तिरुवनंतपुरम येथे पहिला एकदिवसीय सामना रंगणार आहे. वेस्ट इंडिजच्या दोन्ही संघांचे नेतृत्व शाई होप करणार आहे. २०२७ च्या वनडे विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका वेस्ट इंडिजसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
हेटमायरचे T20 संघात पुनरागमन
वेस्ट इंडिजच्या टी-२० संघात स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायर याचे पुनरागमन झाले आहे. मात्र, तो वनडे मालिकेत खेळणार नाही. CPL मधील प्रभावी कामगिरीनंतर हेटमायरला पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवायक्वेंटिन सॅम्पसन यालाही टी-२० संघात स्थान मिळाले आहे. त्याने यापूर्वी वेस्ट इंडिजकडून टी-२० विश्वचषकात सहभाग घेतला होता. टी-२० संघात कामिल पूरन याला प्रथमच संधी देण्यात आली आहे. चालू कॅरेबियन प्रीमियर लीगमधील दमदार कामगिरीच्या जोरावर त्याची निवड करण्यात आली आहे.
वनडे संघात जॉन कॅम्पबेलचे पुनरागमन
वनडे संघात अनुभवी सलामीवीर जॉन कॅम्पबेलचे पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील अखेरचे दोन सामने तो खेळू शकला नव्हता. तसेच दुखापतीमुळे अकीम ऑगस्टेभारत दौऱ्यातून बाहेर आहे. त्याच्या जागी ज्वेल अँड्र्यूचा संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, अनुभवी अष्टपैलू जेसन होल्डरला या भारत दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.
भारत-वेस्ट इंडिज मालिकेचे वेळापत्रक
तीन सामन्यांची वनडे मालिका २७ सप्टेंबरपासून सुरू होणार असून ३ ऑक्टोबरला संपेल. त्यानंतर ६ ते १७ ऑक्टोबरदरम्यान पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल.
वनडे संघ
शाई होप (कर्णधार), ज्वेल अँड्र्यू, जॉन कॅम्पबेल, कीसी कार्टी, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, जस्टिन ग्रीव्ह्ज, अमीर जांगू, अल्झारी जोसेफ, शमार जोसेफ, विटेल लॉज, गुडाकेश मोती, कीमो पॉल, शेर्फेन रदरफोर्ड, जेडन सील्स.
टी-२० संघ
शाई होप (कर्णधार), ज्वेल अँड्र्यू, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, अकील हुसेन, शमार जोसेफ, गुडाकेश मोती, कीमो पॉल, कामिल पूरन, रोव्हमन पॉवेल, शेर्फेन रदरफोर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, रोमारियो शेफर्ड, शमार स्प्रिंगर.
भारताने यापूर्वीच आपले संघ जाहीर केले आहेत. वनडे संघाचे नेतृत्व शुभमन गिल, तर टी-२० संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे.





