क्रिकेट विश्वात खळबळ! वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूवर ११ महिलांनी केला लैंगिक अत्याचाराचा आरोप

West Indies Cricketer Faces Sexual Assault Allegations : वेस्ट इंडिज क्रिकेट संघातील एका खेळाडूवर ११ महिलांनी लैंगिक अत्याचार आणि बलात्काराचे गंभीर आरोप केले आहेत. ही धक्कादायक बातमी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बारबाडोस येथे सुरू असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान समोर आली आहे. गयाना येथील या खेळाडूवर एका अल्पवयीन मुलीसह ११ महिलांनी लैंगिक शोषण, बलात्कार आणि अवांछित शारीरिक जवळीक केल्याचा आरोप केला आहे. गयानास्थित ‘काईटूर न्यूज’ आणि ‘स्पोर्ट्समॅक्स टीव्ही’ने ही माहिती प्रसिद्ध केली आहे.
तो क्रिकेटपटू गयानाचा –
वेस्ट इंडीजमधील मीडिया आउटलेट्सच्या अहवालानुसार, वेस्ट इंडीजमधील एका अज्ञात पुरुष क्रिकेटपटूवर लैंगिक छळ आणि बलात्काराचे अनेक आरोप झाले आहेत. कैरेबियनमधील स्पोर्ट्समॅक्स टीव्हीच्या व्हिडिओ अहवालानुसार, हा क्रिकेटपटू गयानाचा आहे आणि सध्या तो राष्ट्रीय संघाचा भाग आहे. तथापि, या क्रिकेटपटूविरुद्ध अद्याप कोणतेही गुन्हे दाखल झालेले नाहीत. क्रिकेट वेस्ट इंडीज (CWI) नेही या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.
तक्रार दाखल करूनही पोलिसांकडून कारवाई नाही –
या प्रकरणात एका पीडितेच्या कुटुंबाने वकील निगेल ह्यूजेस यांच्याशी संपर्क साधला असून, त्यांनी सांगितले की, हा खेळाडू २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात विजयाचा नायक होता. एका पीडितेच्या आईने सांगितले की, ३ मार्च २०२३ रोजी न्यू एम्स्टरडॅम, बर्बिस येथे तिच्या १८ वर्षीय मुलीवर या खेळाडूने अत्याचार केले. तक्रार दाखल करूनही पोलिसांनी कारवाई केली नाही, असा दावा तिने केला आहे.
हेही वाचा – WI vs AUS : वेस्ट इंडिजच्या गोलंदाजावर ICC ची कडक कारवाई, पॅट कमिन्सविरुद्धची ‘ती’ कृती भोवली
क्रिकेट वेस्ट इंडिज (CWI) चे अध्यक्ष काय म्हणाले?
क्रिकेट वेस्ट इंडिज (CWI) चे अध्यक्ष किशोर शैलो यांनी या प्रकरणाची माहिती नसल्याचे सांगितले. “आम्हाला याबाबत कोणतीही माहिती नाही, त्यामुळे सध्या भाष्य करणे शक्य नाही,” असे त्यांनी स्पोर्ट्समॅक्सला सांगितले. आतापर्यंत कोणतीही औपचारिक तक्रार दाखल झालेली नाही, आणि खेळाडूविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला नाही. मात्र, या आरोपांनी क्रिकेट विश्वात खळबळ माजवली आहे. सोशल मीडियावरही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, कारवाईची मागणी होत आहे.
हेही वाचा – Pat Cummins : पॅट कमिन्सने रचला नवा इतिहास, रिची बेनॉडचा मोडला ६३ वर्षांपूर्वीचा विक्रम
या घटनेमुळे वेस्ट इंडिजच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या बारबाडोस येथील पहिल्या कसोटीत चुरस पाहायला मिळत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, याबाबत अधिक माहिती समोर येणे बाकी आहे.





