MLA Car Bomb Attack : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलेले असताना दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील भांगड परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. शौकत मोल्ला यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी बॉम्ब फेकल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने या हल्ल्यात आमदार मोल्ला यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार मोल्ला हे पोलरहाट बाजार परिसरातून परतत असताना रात्री उशिरा त्यांच्या वाहनावर बॉम्ब फेकण्यात आला. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. सुरक्षारक्षक आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. शेतातून जिवंत बॉम्ब जप्त घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलरहाट पोलीस ठाण्याजवळील शेतातून अनेक जिवंत बॉम्ब जप्त करण्यात आले. बॉम्ब स्क्वॉडच्या मदतीने ही स्फोटके निष्क्रिय करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत तीन संशयितांना अटक करण्यात आली असून भांगडमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. TMC चा ISF वर आरोप तृणमूल काँग्रेस (TMC) ने या हल्ल्यामागे इंडियन सेक्युलर फ्रंट (ISF) समर्थित घटकांचा हात असल्याचा आरोप केला आहे. आमदार मोल्ला यांनी सांगितले की, तृणमूल नेते खैरुल इस्लाम यांच्यावर झालेल्या पूर्वीच्या हल्ल्यानंतर ते त्यांच्या भेटीस गेले होते. परतताना त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. ISF कडून आरोप फेटाळले ISF अध्यक्ष नौशाद सिद्दीकी यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. ही घटना राजकीय नाटक असू शकते, अशी शंका व्यक्त करत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. आवश्यक असल्यास राष्ट्रीय तपास संस्था (NIA) कडून चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली. भांगड पुन्हा हिंसेच्या छायेत भांगड परिसरात यापूर्वीही तृणमूल नेते खैरुल इस्लाम यांच्यावर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. निवडणुका जवळ येत असताना TMC आणि ISF यांच्यातील संघर्ष उघडपणे समोर येत असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदानापूर्वी शांतता प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.