West Bengal Election 2026: “हे स्थलांतर नाही, तर एक शांत निरोप आहे”… अभिनेत्री पूजा बॅनर्जींचा बंगालच्या परिस्थितीवर भावनिक सूर
West Bengal Election 2026 पूजा बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधून होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतराबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हे स्थलांतर लोकांच्या इच्छेने होत नाही, तर नाईलाजाने घडत आहे. “हे स्थलांतर नाही, तर एक शांत निरोप आहे,” असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानाने सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

West Bengal Election 2026: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. २३ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडले. मात्र या निवडणुकीसोबतच राज्यातील राजकीय वातावरण तणावपूर्ण असल्याचेही दिसून आले. काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. या पार्श्वभूमीवर टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत राज्यातील परिस्थितीबाबत आपले मत मांडले आहे. (West Bengal Election 2026)
पूजा बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधून होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतराबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हे स्थलांतर लोकांच्या इच्छेने होत नाही, तर नाईलाजाने घडत आहे. “हे स्थलांतर नाही, तर एक शांत निरोप आहे,” असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानाने सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
त्यांनी सांगितले की, बंगालमध्ये तरुणांसाठी पुरेशा नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक युवक राज्य सोडून इतर शहरांकडे वळत आहेत. “लोक तिथेच राहतात जिथे त्यांना संधी मिळते. जिथे संधी नसते, तिथून त्यांना जावे लागते,” असे त्यांनी नमूद केले. त्यांनी काही आर्थिक आकडेही सांगितले, ज्यावरून राज्यातील औद्योगिक विकास कमी झाल्याचे दिसते. (West Bengal Election 2026)
View this post on Instagram
पूजा बॅनर्जी यांनी पुढे सांगितले की, इतर शहरे आणि राज्ये झपाट्याने विकसित होत आहेत. तिथे नवीन उद्योग, रोजगाराच्या संधी आणि वाढत्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे युवक नैसर्गिकरित्या तिकडे आकर्षित होत आहेत. “एका पिढीला आपण किती काळ थांबायला सांगणार? किती काळ त्यांनी तडजोड करायची?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (West Bengal Election 2026)
त्यांनी बंगालच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची आठवण करून दिली. “ही तीच भूमी आहे जिथे रवींद्रनाथ टागोर, सुभाष चंद्र बोस आणि सत्यजित रे यांसारखे महान व्यक्तिमत्त्व जन्माला आले. येथे प्रतिभेची कमतरता कधीच नव्हती. पण आज त्या प्रतिभेला योग्य संधी मिळत नाही,” असे त्यांनी सांगितले.
पूजा बॅनर्जी यांच्या मते, बंगालमधील युवकांना त्यांच्या स्वप्नांसाठी राज्य सोडावे लागत आहे, ही खूप दु:खद बाब आहे. “आम्ही जिथे जाऊ, तिथे बंगालला सोबत घेऊन जाऊ. पण आम्हाला आमच्या घरातून जावे लागू नये, अशी परिस्थिती निर्माण व्हावी,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी एकूण २९४ जागांवर दोन टप्प्यांत मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यानंतर आता २९ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात मुख्य लढत आहे. निवडणुकीचे निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहेत.
पूजा बॅनर्जी यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील रोजगार, उद्योग आणि स्थलांतर या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.





