West Bengal & Tamil Nadu Assembly Elections 2026: पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या दोन मोठ्या राज्यांमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. शांततेत आणि निर्भय वातावरणात मतदान पार पडावे यासाठी निवडणूक आयोगाने दोन्ही राज्यांमध्ये अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था उभी केली आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये आधीच्या निवडणुकांमध्ये हिंसेचा इतिहास असल्यामुळे यंदा सुरक्षा अधिक कडक ठेवण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होत असून अनेक महत्त्वाच्या जागांवर मतदार आपला हक्क बजावत आहेत. या टप्प्यात सुमारे ३.४ कोटी मतदार मतदान करणार आहेत. निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तब्बल २४०७ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. म्हणजेच साधारण अडीच लाख जवान राज्यभरात तैनात आहेत. प्रत्येक १०० ते १३० मतदारांमागे एक जवान अशी व्यवस्था करण्यात आली आहे. (West Bengal & Tamil Nadu Assembly Elections 2026) मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगचीही सोय करण्यात आली आहे, त्यामुळे प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात आहे. तसेच, मतदानात अडथळा आणणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. रस्त्यांवर गाड्यांची गस्त सुरू असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या गाड्या जवानांचे संरक्षण करतील. या निवडणुकीतील काही जागा अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. नंदीग्राम, सिलीगुडी, दार्जिलिंग, मालदा, मुर्शिदाबाद यांसारख्या जागांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळेच पहिला टप्पा निर्णायक मानला जात आहे. West Bengal & Tamil Nadu Assembly Elections 2026: बंगाल-तमिळनाडूत मतदान चालू; कडेकोट सुरक्षा, लाखो जवान तैनात दरम्यान, केंद्रीय दलांच्या मोठ्या प्रमाणातील तैनातीवर राजकीय वादही सुरू आहेत. काही पक्षांचे म्हणणे आहे की ही तैनाती मतदारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे, तर काही पक्षांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ( West Bengal & Tamil Nadu Assembly Elections 2026) तमिळनाडूमध्येही आजच मतदान होत असून राज्यातील एकूण २३४ जागांसाठी निवडणूक घेतली जात आहे. राज्यात सुमारे ५.७३ कोटी मतदार मतदान करणार आहेत. येथे एकूण ७५ हजारांहून अधिक मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यापैकी जवळपास ५९३८ केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या संवेदनशील केंद्रांवर विशेष सुरक्षा ठेवण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात जवळपास १.४७ लाख सुरक्षाकर्मी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये पोलीस, अर्धसैनिक दल, अग्निशमन विभाग, होमगार्ड तसेच निवृत्त सैनिकांचा समावेश आहे. याशिवाय केंद्रीय दलांच्या २९५ कंपन्यांमधील सुमारे २३ हजार जवानही तैनात आहेत. मतदानादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. सुमारे ५१४ वाहनांमधून गस्त घालण्यात येणार आहे. तसेच त्वरित प्रतिसाद देणारी पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. एकूणच, दोन्ही राज्यांमध्ये मतदान हा लोकशाहीचा उत्सव असला तरी, तो सुरक्षित आणि शांततेत पार पडावा यासाठी प्रशासनाने भक्कम तयारी केली आहे.