Mamata Banerjee – पश्चिम बंगालची सत्ता गमावल्यानंतर तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आणखीच आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्यांनी एकप्रकारे निवडणुकीचा निकाल अमान्य केला. एवढेच नव्हे तर, मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्यास स्पष्ट नकार दर्शवला. त्यामुळे बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय नाट्य रंगण्याचे संकेत मिळू लागले आहेत. कमालीची राजकीय प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. त्या राज्यात सत्ताबदल झाला. भाजपने घवघवीत यश मिळवत तृणमूलची १५ वर्षांची राजवट संपुष्टात आणली. भाजपने जागांचे द्विशतक ठोकत दोन-तृतीयांश बहुमत मिळवले. तर, सलग चौथ्यांदा सत्ता मिळवण्याचे मनसुबे बाळगणाऱ्या तृणमूलच्या आकांक्षा धुळीस मिळाल्या. त्यानंतर मंगळवारी कोलकत्यात पत्रकार परिषद घेत ममतांनी निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जनादेशामुळे आमचा पराभव झाला नाही; तर कारस्थान रचून आम्हाला हरवण्यात आले. West Bengal Election 2026: मी मुख्यमंत्री म्हणून राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यासाठी मी राज्यपालांकडे जाणार नाही. माझ्यावर घटनात्मक निकषांनुसार कुठली कारवाई करायची असेल तर जरूर करावी, असे आव्हान त्यांनी दिले. मतमोजणीत मोठ्या प्रमाणात अनियमितता घडल्या. जवळपास १०० जागांची अक्षरश: लूट करण्यात आली. तृणमूलचा निवडणुकीतील लढा भाजपशी नव्हताच. आमचा लढा भाजपसाठी काम करणाऱ्या निवडणूक आयोगाशी होता. माझ्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत मी अशी निवडणूक कधीच पाहिली नाही. इतिहासात काळा अध्याय जोडला गेला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार खलनायक ठरले, अशी घणाघाती टीका ममतांनी केली. केंद्रीय यंत्रणांच्या कार्यशैलीविषयीही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पुढील वाटचालीविषयीचे सूतोवाचही ममतांनी केले. राष्ट्रीय स्तरावरील विरोधी पक्षांची इंडिया आघाडी मजबूत करण्यावर आता माझा फोकस असेल. आघाडीचे अनेक नेते माझ्या पाठिशी उभे राहिले. सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, हेमंत सोरेन आदींनी माझ्याशी फोनवरून संवाद साधला. खुर्चीवर असेपर्यंत मी अनेक बाबी सहन केल्या. मात्र, आता मी सामान्य नागरिक बनले आहे. आता मी मुक्त पक्षी झाले आहे. मी रस्त्यांवर उतरून लढणारी आहे. त्यामुळे अन्याय-अत्याचाराविरोधात रस्त्यांवर उतरेल, असे त्या म्हणाल्या.