“ईडीपासून मुक्ती मिळावी म्हणून भाजपसोबत गेलो”; विधानसभा निवडणुकांदरम्यान भूजबळांचा दावा; पण…

Chhagan Bhujbal | विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय नेतेमंडळींची जोरदार तयारी सुरु झाली आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु असताना छगन भुजबळ यांनी केलेल्या दाव्याने महायुती सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकातील छगन भुजबळ यांनी सांगितलेल्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पुस्तकातील दाव्यानुसार, ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी भाजपमध्ये गेल्याचं छगन भुजबळ म्हणाले.
ईडीपासून सुटका म्हणजे पुनर्जन्मच
‘अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता. कारण ईडीपासून सुटका झाल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता,’ असे राज्याचे अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ हे सूचित करतात.
भाजपबरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून सुटका
‘अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, नवाब मलिक अशा विविध नेत्यांना ईडीच्या चौकशांना सामोरे जावे लागले होते. मला, देशमुख व मलिकांना ईडीने अटक केली होती. यावेळी पंतप्रधान मोदी वा भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही ही साऱ्यांचीच भावना झाली होती. हा विषय आम्ही शरद पवार यांच्याकडे मांडला. पण ते भाजपबरोबर जाण्यास अनुकूल नव्हते. अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पक्षाच्या बहुतांशी नेत्यांना मान्य होता. भाजपबरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून साऱ्यांची सुटका झाली’, अशी भावना भुजबळांनी व्यक्त केली.
‘दोन-अडीच वर्षे तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत किती वेळा चौकशांना सामोरे जायचे, असा प्रश्न होता. अनिल देशमुख तुरुंगात असताना भाजपमध्ये सहभागी व्हा तरच सुटका होईल, असा निरोप देशमुख यांना देण्यात आला होता, असा त्यांचा आरोप आहे. तेव्हा आता ते मलाही अडकविण्याचा पुन्हा प्रयत्न करीत असावेत, अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते. आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही’, असे भुजबळ म्हणतात. हा सारा तपशील ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात नोंदवण्यात आला आहे.
पुस्तकातील दावे छगन भुजबळ यांनी फेटाळले
दरम्यान, या पुस्तकातील दावे छगन भुजबळ यांनी फेटाळून लावले आहेत. तसेच मी हे पुस्तक वाचले नाही आणि अशी कोणतीही मुलाखत दिली नाही. राजदीप सरदेसाई यांचे ‘२०२४: द इलेक्शन देंट सरप्राइज्ड इंडिया’ हे पुस्तक काही दिवसांनी वाचेन, माझ्या वकिलांनाही देईन आणि त्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई करेन, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा:
पंतप्रधान मोदींची आज ‘या’ जिल्ह्यात तोफ धडाडणार; कसे असणार कार्यक्रमाचे नियोजन?





