पंतप्रधान मोदींची आज ‘या’ जिल्ह्यात तोफ धडाडणार; कसे असणार कार्यक्रमाचे नियोजन?

PM Modi | विधानसभा निवडणुकीसाठी दिग्गज नेते मंडळींकडून प्रचार सभा घेतल्या जात आहेत. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राज्यातील प्रचाराची रंगत वाढणार आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींची आज धुळे व नाशिकमध्ये सभा होणार आहे. यासाठी महायुतीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यात आठवडाभराच्या कालावधीत त्यांच्या 9 सभा होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज होणाऱ्या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महायुतीचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची दुपारी 12 वाजता धुळ्यात तर 2 वाजता नाशिकमध्ये सभा असणार आहे. धुळे शहरातील गोशाळा मैदानाच्या 45 एकरावर नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.
कार्यक्रमाचे नियोजन
धुळ्यातील सभा आटोपल्यानंतर मोदींचे हेलिकॉप्टर नाशिकला छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नीलगिरी बागेतील हेलिपॅड येथे उतरेल. तेथून मोटारीने ते तपोवनातील सभास्थळाकडे येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिकमधील सभेची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हाभरातून तब्बल एक लाख लोकांची सभेला उपस्थिती असेल, असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.
तसेच उन्हाच्या झळांपासून रक्षण होण्यासाठी सभास्थळी तब्बल सहा भव्य डोमची उभारणी करण्यात येत आहे. तसेच सभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी एसपीजी कमांडो, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह तब्बल साडे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. शहरातील वाहतूक मार्गातही मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे.
आजपासून पीएम मोदींच्या सभेला सुरूवात
दरम्यान, ८ नोव्हेंबरपासून पीएम मोदींच्या सभेला सुरूवात होत आहे. राज्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी पीएम मोदी या सभा घेत आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ 12 नोव्हेंबर रोजी पुण्यात त्यांची सभा होणार आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आज सांगली, कोल्हापूर, सातारामध्ये त्यांच्या सभा होणार आहेत.
आज मोदींची धुळे आणि नाशिकला सभा होईल. त्यानंतर 9 नोव्हेंबर रोजी नांदेड, अकोला, चिमूर येथे त्यांची सभा होणार आहे. 12 नोव्हेंबरला पुणे येथे सभा होणार आहे. 13 नोव्हेंबर रोजी सोलापूर आणि कोल्हापूर येथे आणि छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबई येथे 14 नोव्हेंबर रोजी त्यांची सभा होणार आहे.
हेही वाचा:





