पुणे जिल्हा | निंबूत गावच्या प्रवेशद्वाराजवळ स्वागत

सोमेश्वरनगर, (वार्ताहर)- ‘माऊली माऊली’चा जयघोष करत श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याने शुक्रवारी (दि.५) सायंकाळी बारामती तालुक्यात प्रवेश केला. निंबूत गावच्या प्रवेशद्वाराजवळ ग्रामस्थांनी या पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. यानंतर हा पालखी सोहळा निंबूत येथील विठ्ठल मंदिरामध्ये आजच्या मुक्कामासाठी विसावला.
दरम्यान, पुरंदर आणि बारामती तालुक्याच्या सीमेवर आनंदनगर व लक्ष्मीनगर येथील ग्रामस्थांनी दिंडीतील वारकऱ्यांना चहा बिस्कीट व पाणी वाटप करत स्वागत केले. निंबूतच्या वेशीवर निंबूत ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्य वतीने भव्य स्वागत करण्यात आले. माजी बांधकाम सभापती प्रमोद काकडे, शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांच्या हस्ते रथाच्या बैलांचे पूजन करण्यात आले.
सोहळाप्रमुख ॲड. त्रिगुण गोसावी यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी उपसरपंच अमरदीप काकडे, माजी सरपंच राजकुमार बनसोडे माजी उपसरपंच उदय काकडे, मदन काकडे, विजयराव काकडे,
शेखर काकडे. निंबूत ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्यासह प्रशासनातील अधिकारी नायब तहसीलदार विलास करे, महावितरणचे किशोर कहार, कृषी अधिकारी मोहन पवार, विस्ताराधिकारी आर. व्ही. चांदगुडे, ग्रामसेवक चंद्रशेखर काळभोर, तलाठी आगम सार्वजनिक बांधकाम व आरोग्य विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे अधिकारी सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे व पोलिस कर्मचाऱ्यांनी पालखीसाठी चोख बंदोबस्त ठेवला. होळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. ज्ञानदीप राजगे, डॉ. कर्णवीर शिंदे, आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी मेहनत घेतली.
होळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वारकऱ्यांसाठी रुग्णवाहिका तैनात केली होती. ग्रामस्थांच्या वतीने ठिकठिकाणी खाद्यपदार्थ, उपवासाचे पदार्थ वाटप केले. निंबूत मुक्कामानंतर शनिवारी पालखी सोहळा सोमेश्वर कारखाना कार्यस्थळावर विसावणार आहे. त्यापूर्वी सोमेश्वर कॉलेजच्या प्रांगणामध्ये पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण होईल.
महिलांनी फुगडीचा आनंद लुटला
यावेळी निंबूत, निंबूत छपरी, लक्ष्मीनगर, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी, रासकरमाळ, फरांदेनगर परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दुतर्फा रांगोळी काढली होती.
बा. सा. काकडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ढोल ताशांसह- लेझीमच्या तालावर सोहळ्याचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी साक्षरतेची प्रचार फेरी काढली. आनंदनगर व लक्ष्मीनगर येथील महिलांनी फुगडी खेळून पालखीचे स्वागत केले. सोहळ्यात १०७ दिंड्या सहभागी आहेत.





