पुणे जिल्हा | कामाबाबतीत दुसरा कुणी आपला हात धरू शकत नाही- अजित पवार

सोमेश्वरनगर, (वार्ताहर)- मी ही दहा वाजेपर्यंत झोपू शकतो. पण मी कामाचा माणूस आहे. मी जे बोलतो ते करूनच दाखवतो. काही जण मात्र फक्त निवडणुकीपुरते येतील.
मात्र तालुक्याचा विकास असाच चालू ठेवायचा असेल तर आपल्या विचारांचा आमदार निवडून द्यावा, असे आवाहन अजित पवार यांनी केले. होळ येथील बूथ कमिटी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, राज्यातील बहिणींना सक्षम करायचे आहे. शेतकऱ्यांना आधार द्यायचा आहे. त्यासाठी हजारो कोटी रुपये सरकार खर्च करीत आहे.
मात्र या योजना भविष्यातही चालू ठेवायच्या असतील तर महायुतीचे सरकार येणे गरजेचे आहे. मी फक्त विनंती करू शकतो. मत कुणाला द्यायचे तो अधिकार तुम्हाला आहे.
मी सेक्युलर माणूस आहे. सर्व धर्मांना सोबत ठेवून आपण विकास करीत आहोत. अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये दिले आहेत. घटनेला कुणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर मी शांत बसेन का हे तुमचेच सरकार आहे.
समाजातील कुठलाही घटक वंचित राहणार नाही याची आपण काळजी घेत आहोत. केंद्रातील सरकार आपल्या विचाराचे आहे. तेव्हा बारामतीचा आमदार ही आपल्या विचाराचा निवडून येईल यासाठी सर्वांनी झटून काम करा, अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
यावेळी युवा नेते जय पवार, पक्ष निरीक्षक सुरेश पालवे, संभाजी होळकर, पुरुषोत्तम जगताप, किरण गुजर, विश्वास देवकाते, सतीश काकडे, प्रमोद काकडे, विक्रम भोसले, पोपट गावडे, राजवर्धन शिंदे, नानासाहेब मदने, सचिन सातव उपस्थित होते.





