Pune District : सोमेश्वरच्या आखाड्यात ६०१ अर्ज दाखल
Pune District : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही सुमारे १० उमेदवारांसह निवडणुकीत प्रवेश केला आहे. काही अपक्षांनीही अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे.

सोमेश्वरनगर : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा रणसंग्राम आता चांगलाच रंगात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर ६०१ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेला मोठा धक्का बसला आहे. कारखाना निवडणुकीतील चुरस वाढण्याची चिन्हे आहेत. अर्ज माघारीनंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार असले, तरी सध्या सोमेश्वरची निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे २७५, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे १४०, भाजपकडे १००, तर शिवसेना शिंदे गटाकडे ५० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही सुमारे १० उमेदवारांसह निवडणुकीत प्रवेश केला आहे. काही अपक्षांनीही अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे.
(स्व) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पहिलीच निवडणूक होत आहे. सोमेश्वर कारखान्यावर अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे. मात्र, अजितदादांच्या निधनानंतर होत असलेली ही पहिलीच कारखाना निवडणूक असल्याने बारामतीच्या पश्चिम भागासह पुणे जिल्ह्याचे लक्ष निवडणुकीकडे लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे असून, विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप, सतीशराव काकडे, प्रमोद काकडे, राजवर्धन शिंदे, शहाजी काकडे, संग्राम सोरटे, सुनील भगत, लक्ष्मण गोफणे, शैलेश रासकर, अभिजीत काकडे, किसन तांबे, आजी-माजी संचालक, मोठ्या संख्येने इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे उमेदवारी निश्चित करताना कोणाला संधी आणि कोणाला न्याय, हे सत्ताधारी गटासमोर मोठे आव्हान असणार आहे.
त्यामुळे सोमेश्वरची निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष चुरशीची लढत रंगणार, याबरोबरच विविध गटांकडून होणारे मतविभाजन कोणाच्या पथ्यावर पडणार, याकडे २९ हजार सभासदांचे लक्ष लागले आहे.
युगेंद्र पवार आव्हान देणार काय?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मोर्चेबांधणी युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. पक्षाकडे १४० इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, सतीश खोमणे, दत्ताजी चव्हाण यांच्यासह नव्या-जुन्या कार्यकर्त्यांची मोट बांधून युगेंद्र पवार सत्ताधारी गटासमोर कितपत आव्हान उभे करतात, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्यास काही इच्छुक शरद पवार गटाचा अधिकृत झेंडा हाती घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे माघारीच्या टप्प्यातच खरी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
भाजपचीही स्वतंत्र मोर्चेबांधणी
भाजपनेही सोमेश्वर कारखाना निवडणुकीत ताकदीने उतरण्याची तयारी केली आहे. माजी आमदार संजय जगताप, सहकार महर्षी चंद्रराव तावरे, रंजन तावरे, शेखर वडणे, दिलीप खैरे, पी. के. जगताप, जिल्हाध्यक्ष दिग्विजय काकडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपकडे १०० इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याने पक्षाची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे.
शिवसेनेचेही स्वतंत्र आव्हान
शिवसेना शिंदे गटाची सूत्रे माजी राज्यमंत्री तथा पुरंदरचे विद्यमान आमदार विजय शिवतारे यांनी हाती घेतली आहेत. डॉ. वसंत दगडे, ॲड. राजेंद्र काळे यांच्यासह शिवसेनेकडूनही मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीतून पुन्हा स्वगृही परतलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष हनुमंत भापकर यांनीही आपल्या समर्थकांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. स्वतःदेखील निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे.
सत्तेत एकत्र; कारखान्यात आमनेसामने
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे सत्तेत एकत्र असले, तरी सोमेश्वर कारखाना निवडणुकीत स्थानिक पातळीवर हेच पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे राज्यातील सत्तासमीकरण आणि स्थानिक सहकाराचे राजकारण यामध्ये वेगळीच समीकरणे पाहायला मिळत आहेत. आता उमेदवारी अर्ज दाखल झाले असले तरी माघारीच्या मुदतीपर्यंत मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे. कोणाची मनधरणी होते, कोण स्वगृही परततो, कोण बंडखोरी करतो आणि कोणता गट कोणासोबत आघाडी करतो, यावर निवडणुकीचे अंतिम चित्र अवलंबून राहणार आहे.
‘पद’ भोगलेल्याना पुन्हा संधी नको?
दरम्यान, कारखान्याच्या सभासदांमध्येही उमेदवारीबाबत चर्चा सुरू झाली आहे. कारखान्याची खरी प्रगती स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या दूरदृष्टीने झाली आहे. पदे घेऊन मिरविणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा संधी देण्यापेक्षा तरुण, उच्चशिक्षित आणि पक्षाशी एकनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी भावना सभासदांमधून व्यक्त होत आहे. कारखान्याविषयी आपुलकी आणि सभासदांविषयी आस्था असलेल्या नव्या चेहऱ्यांना नेतृत्वाची संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
निवडणूक कार्यक्रम
अर्जांची छाननी : १५ सप्टेंबर २०२६
उमेदवारी अर्ज माघार : १६ ते ३० सप्टेंबर २०२६
अंतिम उमेदवार यादी : १ ऑक्टोबर २०२६
मतदान : ११ ऑक्टोबर २०२६
मतमोजणी व निकाल : १२ ऑक्टोबर २०२६.





