Pune District : आठवडे बाजार जलमय, घरात गटारीचे पाणी
Pune District : अनेक वर्षांपासून बंदिस्त गटाराचा प्रश्न प्रलंबित असून प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

राजगुरुनगर : राजगुरुनगर शहरात शुक्रवारी दुपारी झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने नगर परिषदेच्या पावसाळापूर्व तयारीचा फज्जा उडाल्याचे चित्र समोर आले. शहरातील अनेक भागांत पाणी साचले, तर आठवडे बाजार परिसर अक्षरशः जलमय झाला. बाजारातील व्यापारी, भाजी विक्रेते आणि नागरिकांना डबक्यातून मार्ग काढत व्यवसाय करावा लागल्याने मोठी गैरसोय झाली.
दरम्यान, राहुल चौक परिसरात राहणारे मुरलीधर कहाणे यांच्या घरात थेट गटाराचे आणि पावसाचे घाण पाणी शिरल्याने मोठी धावपळ उडाली. घरातील संसारोपयोगी वस्तू, कपडे, धान्य आणि इतर साहित्य घाण पाण्यात भिजल्याने कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. अचानक दुर्गंधीयुक्त पाणी घरात घुसल्याने कहाणे कुटुंब हादरून गेले.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात सुरू असलेल्या एका बांधकाम प्रकल्पादरम्यान गटार व्यवस्थेचे कोणतेही योग्य नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे जुनी गटार व्यवस्था तुंबली असून पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे. शुक्रवारी झालेल्या पावसात ही गंभीर बाब उघड झाली. उताराच्या दिशेला असलेल्या कहाणे यांच्या घरातून गटाराचे पाणी अक्षरशः आरपार वाहत गेले. घटनेची माहिती मिळताच नगर परिषद कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र गटारांची बिकट अवस्था आणि अपुर्या नियोजनामुळे कर्मचारीही हतबल झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. अनेक वर्षांपासून बंदिस्त गटाराचा प्रश्न प्रलंबित असून प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते राहुल पिंगळे यांनी संबंधित कुटुंबाची भेट घेऊन नगर परिषदेमार्फत हा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र नागरिकांनी आता केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष काम हवे, अशी भूमिका घेतली आहे. अन्यथा आगामी पावसाळ्यात शहरातील अनेक कुटुंबांना अशाच समस्यांना सामोरे जावे लागू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पावसाळ्यापूर्वी प्रश्न सोडवा
पहिल्याच पावसात शहरातील गटार व्यवस्था कोलमडत असेल, तर मुसळधार पावसात नागरिकांनी काय करायचे? असा संतप्त सवाल राहुल चौक परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई होणार का? आणि बंदिस्त गटाराचा प्रश्न पावसाळ्यापूर्वी सोडवला जाणार का? असे प्रश्नही नागरिकांकडून विचारले जात आहेत.
हेही वाचा : Pune District : जुन्नरच्या पूर्व भागात गारपीट, शेतकऱ्यांचे नुकसान





