Indurikar Maharaj : “20 रुपयांत झालं लग्न, लग्नाच्या दिवशीही केलं कीर्तन”; इंदुरीकर महाराजांनी सांगितली त्यांच्या लग्नाची गोष्ट
Indurikar Maharaj : गेल्या तीन दशकांपासून ते कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करत असून, याच कार्यामुळे त्यांना ‘समाज प्रबोधनकार’ ही ओळख मिळाली असल्याचे इंदुरीकर महाराजांनी सांगितलं.

Indurikar Maharaj : प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांनी प्रथमच एका न्यूज चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक न सांगितलेल्या आठवणींना उजाळा दिला. ग्रामीण मातीतून घडलेला प्रवास, कीर्तनसेवेतील अनुभव, विवाहाची साधी कहाणी आणि आई-वडिलांप्रती असलेली निष्ठा याबाबत त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला.
अन् ‘समाज प्रबोधनकार’ ही ओळख मिळाली
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदुरी हे त्यांचे मूळ गाव. बीएस्सी आणि बी.एड. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ विनाअनुदानित शाळेत शिक्षक म्हणून काम केले. मात्र घरातील आध्यात्मिक वातावरणाचा प्रभाव आणि कीर्तनाची ओढ यामुळे त्यांनी कीर्तनसेवेला वाहून घेतले. गेल्या तीन दशकांपासून ते कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करत असून, याच कार्यामुळे त्यांना ‘समाज प्रबोधनकार’ ही ओळख मिळाली असल्याचे इंदुरीकर महाराजांनी सांगितलं.
कृत्रिम गोष्टी फार काळ टिकत नाहीत, पण…
आपल्या लोकप्रिय कीर्तनशैलीबाबत बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले, “माझा जन्म आणि वाढ ग्रामीण वातावरणात झाली. त्यामुळे ग्रामीण बोली आणि तेथील जीवनशैली माझ्या स्वभावाचा भाग बनली. कृत्रिम गोष्टी फार काळ टिकत नाहीत, पण नैसर्गिकपणा लोकांच्या मनाला भिडतो. माझ्या कीर्तनातील विनोद आणि उदाहरणे ही मी स्वतः अनुभवलेल्या किंवा पाहिलेल्या घटनांवर आधारित असतात. त्यामुळे श्रोते त्यांच्याशी सहज जोडले जातात.”
संपूर्ण लग्नसोहळ्याचा खर्च फक्त २० रुपये झाला
महाराजांनी आपल्या विवाहाची आठवण सांगताना याअगोदर कधीही न ऐकलेला एक रंजक किस्सा उलगडला. ते म्हणाले, “वडिलांचे वय झाले होते. त्यांच्या डोळ्यांसमोर माझे लग्न व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे लग्न ठरल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत विवाह पार पडला. संगमनेरमधील एका मंदिरात अत्यंत साधेपणाने आमचे लग्न झाले. माझी पत्नीही अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. गरीब घरातील मुलीशीच विवाह करायचा, असे मी आधीच ठरवले होते. दोन कीर्तनांच्या मधल्या वेळेत माझा विवाह झाला. संपूर्ण लग्नसोहळ्याचा खर्च फक्त २० रुपये झाला. दोन हारांमध्ये आमचे लग्न पार पडले. विशेष म्हणजे लग्नाच्या दिवशी मी दोन कीर्तने केली, तर माझ्या पत्नीनेही रात्री कीर्तनसेवा केली.”
…म्हणून लोकं हसतात
आपल्या कीर्तनातील विनोदाचे रहस्य सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, लोकांच्या जीवनाशी संबंधित उदाहरणे दिली की ती त्यांच्या मनाला भिडतात. “मी सांगणाऱ्या अनेक घटना माझ्या डोळ्यांसमोर घडलेल्या असतात. त्यामुळे त्या वास्तवाशी जोडलेल्या असतात आणि लोक त्यावर मनापासून हसतात.”
संतांच्या विचारांपासून समाज दूर गेला की अवगुण वाढतात
वारकरी संप्रदायाच्या योगदानाबाबत बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले, “आजही समाजातील संस्कार आणि संस्कृती मोठ्या प्रमाणात वारकरी परंपरेमुळे टिकून आहेत. ज्या घरात तुळशीला पाणी घातले जाते, गाईची सेवा केली जाते आणि पाहुण्यांचे आदरातिथ्य केले जाते, त्या घरातील पिढी संस्कारी घडते. संतांच्या विचारांपासून समाज दूर गेला की अवगुण वाढतात. त्यामुळे संतांची शिकवण आचरणात आणणे आवश्यक आहे.”
Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून २७२०३ क्युसेकने विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना अलर्ट






