Weather update : राज्यावर अवकाळी संकट ! पुढील 24 तास महत्त्वाचे, अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
हवामान विभागाने नागरिकांना वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीच्या शक्यतेमुळे आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Weather update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असून, अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे.
यामध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 24 तास नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून, विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यातील अनेक भागांत उष्णतेचा प्रभाव काहीसा कमी झाला असला तरी अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे.
वीज कोसळून जनावरांचा मृत्यू :
नांदेड जिल्ह्यात सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे उमरी तालुक्यातील बोळसा परिसरात दुर्दैवी घटना घडली.
शेतातून जनावरे घेऊन घरी परतत असताना अचानक वीज कोसळल्याने आठ शेळ्या आणि एका गायीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जळगावमध्ये मुसळधार पावसाने उडाली धांदल :
जळगाव शहर आणि परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी अचानक वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या या पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. यावेळी नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
याशिवाय गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव शिवारात वीज कोसळल्याने दोन जनावरांचा मृत्यू झाला. जोरदार वारे आणि पावसामुळे अनेक ठिकाणी घरांचे तसेच शेतीचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालांमधून समोर आले आहे.
तापमानात चढ-उतार, मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा :
दरम्यान, परभणी, धाराशिव आणि धुळे येथे 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांतील पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानात घट झाली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, नैऋत्य मान्सून राज्याच्या दिशेने वेगाने सरकत असून, त्याच्या आगमनापूर्वी अशा स्वरूपाचे मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन :
हवामान विभागाने नागरिकांना वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीच्या शक्यतेमुळे आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी पिके, जनावरे आणि शेती साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे, तर नागरिकांनी खराब हवामानाच्या काळात अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






