Weather Update : अवकाळी पावसानंतर शहरात उकाड्यात वाढ

Weather Update : अवकाळी पावसानंतर शहरातील उकाडा वाढला आहे. गेल्या २४ तासांत कमाल व किमान तापमनात फारसा बदल झाला नसून, ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे दिवसभर उकाडा जाणवत होता.
लोहगाव येथे ३५.४, तर अन्य परिसरात ३२ ते ३३ अंशांच्या आसपार कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात कमाल तापमानात एक ते दोन अंशाने वाढ होऊन उकाडा वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
आठवडाभर शहरात ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव सुरू असून, दोन दिवसांपूर्वी शहरासह जिल्ह्यात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. परिणामी ४० अंशांवर पोहोचलेले कमाल तापमानात ३५ अंशांपर्यंत खाली आले.
गेल्या २४ तासांत अवकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे. दिवसभर ऊन, ढगाळ हवामान मध्येच पावसाच्या हलक्या सरी, तर रात्री गारवा अशा तीनही ऋतुंचा अनुभव पुणेकर घेत आहे. हे बदलते हवामान आरोग्याच्या समस्या वाढवत असून, पुढील दोन दिवस असेच वातावरण राहण्याचा अंदाज आहे.





