Pune : सुट्टीला घरी जात असताना काळाचा घाला; दौंड रेल्वे स्थानकात रुळात सापडून जवानाचा दुर्देवी मृत्यू

दौंडः चैन्नई मुंबई एक्सप्रेस या धावत्या रेल्वेतून पडून सैन्य दलात काम करणाऱ्या जवानाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भाऊसाहेब देवकर( वय ४८ रा. शहापूर, ता. नेवासा, जिल्हा अहिल्यानगर) असे या दुर्देवी घटनेत मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. भाऊसाहेब हे चैन्नई येथून आपल्या घरी जाण्यासाठी चैन्नई-मुंबई एक्सप्रेस या रेल्वेने निघाले होते. मात्र, दौंड रेल्वे स्थानकात उतरून पुढे ते अहिल्यानगर येथे जाणार होते. परंतु, चैन्नई-मुंबई एक्सप्रेसला दौंड रेल्वे स्थानकात थांबा नव्हता. तेव्हा ते पाठीवरची बॅग घेऊन धावती रेल्वे पकडण्यासाठी धावले असता पडले आणि हा अपघात झाला.
ज्यावेळी भाऊसाहेब हे फलाटावर पडले, त्यावेळी त्यांच्या पाठीला जड बॅग अडकवली असल्याने या बॅगेचा तोल गाडीच्या दिशेला गेला आणि ते रुळामध्ये सापडल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यूदेह त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्त करण्यात आला असून भाऊसाहेब यांचे अशा अकाली अपघाती निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अन् काळाने घाला केला
भाऊसाहेब देवकर वय वर्ष ४८ हे अंदमान निकोबार येथे सैन्यात नाईक पदावर काम करत होते. त्यांना सुटीनिमित्ताने ते आपल्या घरी निघाले होते. परंतु, काळाने त्यांच्यावर घाला घाताला आणि त्यांचा या अपघातामध्ये दुर्देवी मृत्यू झाला.





