Vadgaonsheri Assembly Constituency: ख्रिस्ती समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडून सोडवू – बापूसाहेब पठारे

विश्रांतवाडी – ख्रिस्ती समाजाने दिलेला पाठिंबा फार महत्त्वाचे योगदान देणारा ठरेल. येणाऱ्या काळात विविध माध्यमातून ख्रिस्ती समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडू व त्यावर नक्कीच तोडगा काढू तसेच मदर तेरेसा महामंडळाची स्थापना करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार व ख्रिश्चन समाजातील तरुण-तरुणींसाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणार, असे आश्वासन बापूसाहेब पठारे यांनी दिले.
खराडी येथे ख्रिस्ती समाजाचे नेते मार्कस पंडीत यांच्या नेतृत्वाखाली ख्रिस्ती समाजाच्या विविध समस्यांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रमुख उपस्थित हे चर्चासत्र पार पडले. समाजाच्यावतीने आगामी निवडणुकीसाठी बापूसाहेब पठारे यांना पाठींबा जाहीर केला. तसेच, ख्रिस्ती समाजाच्या समस्या विधानसभेत मांडण्याची विनंती पठारे यांना केली.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्रोग्रेसिव्ह पीपल काँग्रेस पक्षाचे सचिव जयप्रकाश पारखे, मिलाग्रास फाउंडेशनचे अध्यक्ष जॉन फर्नांडिस, कोकणी सभेचे अध्यक्ष जो रोड्रिग्ज, तामिळ सभेचे अध्यक्ष ऍडविन अलेक्स, रविभाऊ कांबळे, जो कसबे, ए. वी. थॉमस, स्वप्नील साळवे, मॅथ्यू थॉमस, पासकल लोपोझ, मधुकर सदाफुले, अमर पंडीत तसेच विविध संघटनांचे मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या चर्चासत्रात सेंट फ्रान्सिस डी सेल्स चर्च, डीव्हाईन मर्सी चर्च, क्राईस्ट द किंग चर्च, कार्मिल चर्च, होली फॅमिली चर्च लोहगाव त्याचप्रमाणे कॅथलिक असोसिएशन ऑफ पुणे, वडगावशेरी मायनॉरीटी काँग्रेस आय पार्टी, ख्रिश्चन कोकणी संघटना, तमिळ ख्रिश संघटना, एस एफ मराठी कॅथलिक संघटना, मिलाग्रास फाउंडेशन वडगावशेरी, पुणे कोकणी ख्रिस्त सभा, ख्रिस्त जागृती मंच या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन विविध विषयांवर सविस्तरपणे चर्चा केली.





