“आमदारांच्या तीन ते चार सुरक्षारक्षकांनी…”; बंडू खांदेवेंचाही गंभीर आरोप, पुण्यातील रात्रीच्या तुफान राड्याची ईनसाईड स्टोरी समोर

MLA Bapusaheb Pathare : पुणे शहरातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांना शनिवारी लोहगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पक्षाच्या नेत्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार पठारे हे लोहगाव परिसरात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातील काही कार्यकर्त्यांसोबत त्यांचा वाद झाला. वादाचे रूपांतर काही वेळातच जोरदार हाणामारीत झाले. मारहाणीच्या घटनेत आमदार पठारे यांना किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती आहे. तणाव वाढल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती आटोक्यात आणली.
नेमकं काय घडलं?
प्रशासनाकडून लोहगाव परिसरातील रस्त्याचे काम काही कारणास्तव थांबवण्यात आले होते. या विरोधात लोहगाव ग्रामपंचायतचे माजी सभापती बंडू खांदवे आंदोलन करणार होते आणि यावरूनच हा वाद झाला. लोहगाव वाघोली रोडवरील गाथा लॅान्स येथे एका माजी सैनिकांच्या सत्काराचा नियोजित कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी बापूसाहेब पठारेंनी हजेरी लावली होती. आमदार पठारे यांची कार्यक्रमस्थळी दाखल होताच दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. यानंतर वाद वाढला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.
अजित पवारांनी दिले आदेश
या मारहाणीच्या प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, वातावरण चिघळू नये म्हणून पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त अमिततेश कुमार यांना फोन करून परिस्थिती हाताळण्याचे आदेश दिले. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत विमानतळ पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.
दोघांनी दिली प्रतिक्रिया
रस्त्याच्या कामावरून उफाळून आलेल्या वादाने मारहाणीचे रुप धारण केले. आता यावर आमदार बापूसाहेब पठारे आणि माजी सभापती बंडू खांदवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारण करू नका. जनता माफ करणार नाही, असं आमदार बापू पठारे म्हणाले आहेत. यावर आमचे आंदोलन हे प्रशासनाविरूद्ध होते परंतू आमदारांनी हा विषय स्वत:वर ओढावून शाब्दिक वाद घातला, असा आरोप बंडू खांदवे यांनी पठारे यांच्यावर केला आहे.
मारहाणीच्या घटनेवरून राजकारण तापलं
या मारहाणीत बंडू खांदवे यांना देखील मारहाण करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच वेळ पडली तर आम्ही गाव विकत घेऊ अशी धमकी देण्यात आली. झटापटीत आमदारांच्या तीन ते चार सुरक्षारक्षकांनी माझे शर्ट फाडले आणि मलाही मारहाण केली, असा गंभीर आरोप खांदवे यांनी केला आहे. या मारहाणीच्या घटनेवरून राजकारण तापलं असून, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळत आहे.





