प्रभात वृत्तसेवा पुणे – लोहगाव परिसरात एका राजकीय कार्यकर्त्यावर आमदार बापूसाहेब पठारे आणि त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांनी हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात कार्यकर्त्यास गंभीर दुखापत झाली असून, सोन्याची चैन हिसकावण्यात आल्याची तक्रार विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.याप्रकरणी बंडु शहाजी खांदवे( ४९, रा.लोहगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनूसार शकील शेख, बापुसाहेब पठारे, महेंद्र आबा पठारे, सुरेंद्र बापूसाहेब पठारे, रवींद्र बापूसाहेब पठारे, किरण बाळासाहेब पठारे, सागर नारायण पठारे, सचिन किसन पठारे आणि रुपये मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार लोहगाव परिसरात अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असून, शेती आणि दुग्धव्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. लोहगाव भागातील रस्त्यांची दुर्दशा आणि अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांच्या वतीने त्यांनी प्रशासनाविरोधात जनआक्रोश आंदोलन आयोजित करण्याचे ठरविले होते. या संदर्भात ४ ऑक्टोबर रोजी आंदोलनाची पोस्ट व्हॉट्सॲपवर प्रसारित करण्यात आली होती. ती पोस्ट लोहगाव मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या मोबाईलवर पाठवली गेल्याने वाद निर्माण झाला. रात्री आमदार पठारे यांनी तक्रारदारास व्हॉट्सॲपवरून संदेश पाठवून “राजकारण म्हणून आंदोलन करायचे का?” असा सवाल करत, “माझ्यासोबत खोटे राजकारण करू नकोस” असा इशारा दिला, असे तक्रारदाराने म्हटले आहे.तक्रारीत पुढे म्हटले आहे की, त्या रात्री सुभेदार मेजर राजेंद्र भोसले यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी तक्रारदार गाथा लॉन्स, संतनगर येथे गेले असताना आमदार पठारे आपल्या गाडीसह तेथे आले. त्यांनी “तुला लय माज आला आहे का?” असे म्हणत शिवीगाळ केली व हाताने मारहाण केली. पुढे त्यांनी त्यांच्या ड्रायव्हर शकील शेखला “हा जिवंत राहू नये, दांडका घेऊन ये” असा आदेश दिला, अशा गंभीर आरोपांची नोंदही तक्रारीत आहे. त्यानंतर शकील शेखने दांडक्याने मारहाण केल्याने तक्रारदार खाली कोसळले. जमिनीवर असतानाही त्यांच्यावर हल्ला सुरूच होता. त्यावेळी आलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत परिस्थिती आणखी बिघडली. हल्ल्यादरम्यान किरण पठारे यांनी तक्रारदाराच्या गळ्यातील सुमारे साडेतीन लाख रुपये किंमतीची सात तोळे वजनाची सोन्याची चैन हिसकावली, असा उल्लेख तक्रारीत आहे. विमानतळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे यांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केल्याचे सांगितले. दरम्यान आमदार पठारे यांच्यावतीनेही तक्रारदाराविरुध्द घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तक्रार दाखल करण्यात आली होती.