Bangladesh: ‘मृतांच्या कारणांचा शोध घेण्यासाठी परदेशी तंत्रज्ञांची मदत घेणार’- पंतप्रधान शेख हसिना

Bangladesh – बांगलादेशात अलिकडेच झालेल्या हिंसक आंदोलनातील मृतांच्या कारणांचा शोध घेण्यासाठी परदेशी तंत्रज्ञांची मदत घेतली जाणार आहे, असे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी म्हटले आहे.
बांगलादेशमध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या वारशांना सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळणाऱ्या ३० टक्के आरक्षणाला विरोध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात १५० जण ठार झाले होते.
या जीवितहानीच्या तपासासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशावरून न्यायिक समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीला मदत म्हणून बांगलादेशकडून संयुक्त राष्ट्राशी संपर्क केला गेला आहे. संयुक्त राष्ट्राने मदत करण्याची तयारी देखील दाखवली आहे.
जर्मनीचे राजदूत अचिन ट्रोस्टर यांनी हसिना यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. मात्र ही तांत्रिक मदत कोणत्या स्वरुपाची असणार आहे, हे सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आलेले नाही.
जीवितहानीबद्दल देशभर दुखवटा
आंदोलनात मरण पावलेल्या १५० व्यक्तींबद्दल सहवेदना व्यक्त करण्यासाठी आज देशभर दुखवटा पाळण्यात आला. लोकांनी कपड्यांवर काळ्या फिती लावाव्या. मशिदी, मंदिरे आणि चर्चमधून मृतांसाठी प्रार्थना आयोजित करण्याचे आवाहन सरकारने केले होते.
आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी संघटनांच्या ६ समन्वयांची पोलिसांनी सुटका करावी आणि आंदोलनात झालेल्या जीवितहानीबद्दल सरकारने माफी मागावी, अशी विद्यार्थी संघटनांची मागणी अजूनही आहे.





