राष्ट्रपुरुषांचा अपमान सहन करणार नाही : खासदार सुजय विखे

नगर -ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जिवाची पर्वा न करता काम केले अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा महाविकास आघाडीमधील नेते सातत्याने द्वेषाने अपशब्द वापरून अपमान करत आहेत. व्रजमूठ तयार करून त्याच व्यासपीठावरून सावरकरांचा अपमान करणे हे लज्जास्पद आहे. मात्र, जनता त्याविरोधात आक्रोश व्यक्त करीत आहे. जनताच त्यांना जागा दाखवेल. भाजप राष्ट्रपुरुषांच्या अपमान कधीही सहन करणार नाही, अशा शब्दांत खा. डॉ. सुजय विखे यांनी महाविकास आघाडीवर तोफ डागली.
भाजप-शिवसेनेतर्फे शनिवारी सकाळी शहरातून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. यात्रेचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, ज्येष्ठ नेते अभय आगरकर, वसंत लोढा, शहरप्रमुख दिलीप सातपुते आदींनी पुष्पहार अर्पण करून केला. शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरून या यात्रेचा समारोप चौपाटी कारंजा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ झाला. या ठिकाणी खा. डॉ. सुजय विखे यांनी सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मनोगत व्यक्त केले.
गंधे म्हणाले की, दोनदा काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेव स्वातंत्र्यसैनिक होते. प्रखर बुद्धिमत्ता असलेल्या महान व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलण्याची कॉंग्रेस नेत्यांची लायकीही नाही. त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांचे नेते लहान तोंडी मोठा घास घेत आहेत.





