नगर । राहुरीतून शिवाजी कर्डिले हेच उमेदवार; खासदार सुजय विखे यांचे सुतोवाच

राहुरी : लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी खूप मेहनत घेतली. यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीतही कर्डिले यांनी खूप मेहनत घेतली होती. त्यांच्यामुळेच नगर-राहुरी विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले आहे. आजपर्यत मी त्यांच्या मार्गदशनाखाली राजकारण करत आलो. त्यांच्या नेतृत्वाच्या अधीन राहून मी काम करणार आहे. त्यामुळे राहुरी विधानसभा मतदार संघात शिवाजी कर्डिले हेच उमेदवार असतील. त्यांच्या विजयासाठी आता मी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील बैठक संपल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपण राहुरी व संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे मतदारसंघात चांगलीच चर्चा सुरु झाली.
विधानसभा निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. डॉ. सुजय विखे पाटील यांनी विधानसभा लढविण्याबाबत वक्तव्य केले. संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करत पक्षाकडे याबाबत इच्छा व्यक्त केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांना राहुरी विधानसभा मतदार संघातून मोठे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे डॉ. सुजय विखे पाटील राहुरी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत उतरतील असा अंदाज होता.
मात्र, दुसर्या दिवशी डाॅ. सुजय विखे पाटील बोलताना म्हणाले की, २०१९ व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी शिवाजी कर्डिले यांनी प्रचंड मेहनत घेतली. तसेच कर्डिले हे या मतदारसंघातून दोनदा आमदार राहिले आहेत. त्यामुळे राहुरी मतदारसंघात कर्डिले हेच लढवणार आहेत. मात्र याबाबत पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील. परंतु सध्या तरी तेच या मतदारसंघातन लढणार असल्याचे डाॅ. सुजय विखे म्हणाले.





