Donald Trump – रशियाबरोबर कोणताही व्यवसाय करणाऱ्या देशावर कठोर निर्बंध घालण्यात येतील, असा गंभीर इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. रशियावर आणखी कठोर निर्बंध घालण्यासाठी रिपब्लिकन सदस्यांकडून ट्रम्प प्रशासनावर मोठा दबाव आणला जाऊ लागला आहे. रशिया आणि व्लादिमीर पुतीन यांच्यावर अमेरिकेच्या संसदेकडून निर्बंध घालण्याची वेळ आली आहे का? असे पत्रकारांनी विचारले असता अशी मागणी केली जाते आहे. मलाही तसेच वाटते आहे, असे उत्तर ट्रम्प यांनी दिले. रशियावरील निर्बंधांसाठी रिपब्लिकन सदस्यांकडून विधेयक मांडण्याची तयारी केली जाते आहे. हे निर्बंध अत्यंत कठोर असतील. विशेषतः जो देश रशियाबरोबर व्यवसाय करेल, त्या देशावर हे लागू होतील. अशा देशांच्या संभाव्य यादीमध्ये इराण देखील असू शकतो, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प प्रशासनाने भारतावर यापुर्वीच ५० टक्के आयात शुल्क लावले आहे. जगात कोणत्याही देशावर अमेरिकेने लावलेले हे सर्वाधिक आयात शुल्क आहे. या ५० टक्क्यांमध्ये रशियाकडून तेल खरेदी करण्याबद्दल २५ टक्के आयात शुल्काचा समावेश आहे. ५०० टक्के आयात शुल्काचा प्रस्ताव… रशियाच्या तेलाची पुन्हा विक्री आणि खरेदी करणाऱ्या देशावर ५०० टक्के आयात शुल्क लावावे असे विदेयक सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी मांडले आहे. या प्रस्तावाला सिनेटच्या परराष्ट्र संबंधांच्या कमिटीमधून जवळपास एकमुखी पाठिंबा मिळतो आहे. र शियाच्या युद्धाला आर्थिक मदत करणाऱ्या देशावर ५०० टक्के आयात शुल्क लावण्याचा रशिया प्रतिबंध कायदा ग्राहम आणि सिनेटर रिचर्ड ब्लूमेंथल यांनी संयुक्तपणे सादर केला आहे, प्रस्तावित कायद्याला सिनेटमधील ८५ सदस्यांचा पाठिंबा आहे. तथापि, स्वस्त रशियन तेल आणि वायू खरेदी करून पुतीन यांच्या युद्धयंत्रणेला पाठिंबा देणाऱ्या चीन, भारत आणि ब्राझील सारख्या देशांविरुद्ध कठोर कर लादणे, हा या युद्धाचा अंत करण्यासाठी अंतिम उपाय आहे, असे ग्राहम आणि ब्लूमेंथल म्हणाले आहेत.