आम्ही CAA कायदा लागू करणारच – अमित शहा

कोलकाता – ज्या राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते आहे ते राज्य कधी विकास करू शकते का? त्यामुळे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सीएए कायद्याला विरोध करत आहेत. मात्र हा देशाचा कायदा आहे तो कोणी रोखू शकत नाही. आम्ही हा कायदा लागू करणारच. तेथून भारतात येणाऱ्या हिंदू बांधवांचा आणि भगिनींचा भारतावर तेवढाच अधिकार आहे जेवढा तुमचा आणि माझा आहे, अशी टिप्पणी भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. ते कोलकाता येथील धर्मतलामधील प्रचारसभेत बोलत होते.
शहा म्हणाले की, २०२६ मध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार प. बंगालमध्ये सत्तेवर येईल. जर राज्यात भाजपचे सरकार हवे असेल तर त्याची पायाभरणी अगोदर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करून केली जावी, असे आवाहन मी येथील जनतेला करतो.
आपल्या भाषणात शहा यांनी लांगुलचालन, घुसखोरी, भ्रष्टाचार आणि राजकीय हिंसाचार आदी विषयांवरून ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. तसेच आगामी सरकार भाजपचे निवडून देण्याचे आवाहन करतानाच तृणमूल कॉंग्रेसचे सरकार उलथून टाका असेही ते म्हणाले. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला दोन तृतियांश बहुमत मिळेल असा विश्वासही शहांनी व्यक्त केला.
ते म्हणाले की, ममता बॅनर्जी अगोदर घुसखोरीच्या मुद्द्यावरून संसदेचे कामकाज रोखून धरत असत. मात्र आता त्या घुसखोरांना आधार कार्ड बनवून देत आहेत. आता या विषयावर त्या गप्प झाल्या आहेत. बंगालमध्ये भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. बॉम्बस्फोटांचे आवाज येत आहेत. नेत्यांच्या घरात पूर्वी कधीही सापडल्या नव्हत्या एवढ्या नोटा सापडत आहेत.
बंगालमध्ये हे सगळे घडते आहे. पूर्वी साहित्य, विज्ञान, कला, उद्योग, अध्यात्म आणि स्वातंत्र्य चळवळीत संपूर्ण देशाचे नेतृत्व बंगालने केले. त्याच राज्याला ममता बॅनर्जी यांनी सगळ्यांत मागे पडणारे राज्य बनवण्याचे काम केले आहे. त्यांनी बंगालचा सत्यानाश केल्याची टीका करतानाच राज्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा आरोपही शहा यांनी ममतांवर केला.
दीदींचा काळ आता गेला
२७ वर्षे बंगालवर कम्युनिस्टांचे राज्य होते. ममता यांनाही तिसरी टर्म मिळाली. या दोन्ही पक्षांनी मिळून बंगालचे वाटोळे केले. बंगालमध्ये सगळ्यांत जास्त निवडणूक हिंसाचार होतो. मात्र आता ममतांचा काळ संपला आहे. आता राज्यात भाजपचे सरकार येणार आहे असा दावा शहा यांनी केला.





