प्रभात वृत्तसेवा पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळवर दाखल केलेले गुन्हे सर्व पुरावे पाहूनच नोंदविले आहेत. कोर्टात सर्व दस्तऐवज, पुरावे सादर करण्यात येतील. गुन्हेगारी टोळ्यांना नामशेष करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असून, त्याचे दीर्घकालीन परिणाम पुणेकर नागरिकांना दिसून येतील, असे ठोस प्रतिपादन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.घायवळ कुटूंबाकडून कोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर कोणतीही टिप्पणी करण्यास त्यांनी नकार दिला. पोलिसांवर आरोप करणाऱ्यांना उद्देशून आयुक्त म्हणाले की, घायवळच्या पत्नी, मुलांच्या पासपोर्टवर कोथरुडचा पत्ता असताना, निलेशच्या पासपोर्टवर अहिल्यानगरचा पत्ता आला कसा? त्याने पासपोर्टसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट नमूद केले आहे की, त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही.आयुक्त पुढे म्हणाले, घायवळ बंधूंनी दहा सदनिका बळकावून त्या ठिकाणी भाडेकरू ठेवून भाडे घेतले आहे. या प्रकरणात ठोस पुरावे असून, त्याच्या बचावासाठी प्रयत्न करणाऱ्यांवरही योग्य ती कारवाई करण्यात येईल. या टोळीच्या अवैध मालमत्तेबाबतही व्यापक स्तरावर कारवाई सुरू आहे. त्यासाठी महापालिका, आयकर विभागाची मदत घेतली जात आहे. सर्व मालमत्तांची चौकशी करून जप्तीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.सचिन घायवळच्या शस्त्र परवान्यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, त्याच्या रेकॉर्डची तपासणी केल्यानंतर परवाना होल्ड करण्यात आला आहे. अशा गुन्हेगारी टोळ्यांचा पाया मोडण्यासाठी आणि नागरिकांचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी पोलीस वचनबद्ध आहेत.