Pune Police : पुणे पोलीसांवरील टीकेला आयुक्त अमितेश कुमार यांचे सडेतोड उत्तर; गुन्हेगारीत घट, कारवायांत वाढ झाल्याचा दावा
Pune Police : खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

Pune Police : पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नऊ पानी सविस्तर पत्र प्रसिद्ध करून शहरातील गुन्हेगारीची वस्तुस्थिती मांडली आहे. (Pune Police)
गेल्या काही वर्षांत गंभीर स्वरूपाच्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा करत पुण्याला “गुन्हेगारीची राजधानी” म्हणणे वस्तुस्थितीला धरून नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Pune Police)
आयुक्तांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२३ ते २०२५ या कालावधीत खून व खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यांमध्ये सुमारे २७ टक्के घट झाली आहे. साखळी चोरीच्या घटनांमध्ये ५५ टक्के, घरफोडीत ३६ टक्के, दरोड्यात २४ टक्के आणि चोरीच्या घटनांमध्ये २४ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. (Pune Police)
बलात्काराच्या घटनांमध्ये ७ टक्के, तर विनयभंगाच्या घटनांमध्ये १ टक्का घट झाल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक घट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. (Pune Police)
मे २०२६ मध्ये दहा दिवसांच्या कालावधीत घडलेल्या काही गाजलेल्या घटनांमुळे शहरातील गुन्हेगारी वाढल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र, या स्वतंत्र घटना असून त्या संपूर्ण शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करत नाहीत, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. या घटनांनंतर विशेष कोम्बिंग ऑपरेशन, वाढीव गस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाया राबवून परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे त्यांनी सांगितले. (Pune Police)
गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या तातडीच्या प्रतिसादामुळे अनेकांचे प्राण वाचल्याचा दावाही पत्रात करण्यात आला आहे. ‘गोल्डन अवर’मध्ये जखमींना त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिल्याने काही प्रकरणांत जीवितहानी टाळता आल्याचे नमूद करण्यात आले आहे. (Pune Police)
राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीचा दाखला देत पुणे हे देशातील सर्वाधिक गुन्हेगारी असलेल्या शहरांपैकी नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. १९ प्रमुख महानगरांमधील दखलपात्र गुन्ह्यांच्या प्रमाणात पुण्याचा क्रमांक खालच्या स्तरावर असून खुनाच्या गुन्ह्यांमध्ये शहराचा क्रमांक ११ वा असल्याचे त्यांनी सांगितले.
संघटित गुन्हेगारीविरोधातील कारवायांचा आढावा घेताना गेल्या दोन वर्षांत २०० मोक्का गुन्ह्यांत एक हजारांहून अधिक गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. (Pune Police)
तसेच २५० हून अधिक जणांना एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले असून ५०० हून अधिक गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. अंमली पदार्थविरोधी मोहिमेत सुमारे २० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विषारी दारू प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे मान्य करत संबंधित तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. महिलांच्या सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सीसीटीव्ही यंत्रणा, आपत्कालीन कॉल बॉक्स आणि फ्लडलाईट्स उभारण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Pune Police)
पत्राच्या शेवटी सोशल मीडियावर पुणे पोलिसांविषयी वस्तुस्थितीविरुद्ध नकारात्मक वातावरण निर्माण केले जात असल्याची खंत व्यक्त करत विधायक टीकेचे स्वागत असले तरी दिशाभूल करणारी माहिती नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करू शकते, असे आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे. (Pune Police)





