Daya Shankar Tiwari :आम्ही डीजे वाजवणारचं! फडणवीसांच्या नागपुरातील भाजप शहराध्यक्षाची रोखठोक भूमिका
Daya Shankar Tiwari : आता भाजपचे नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी डीजे बंदीला विरोध करत आक्रमक भूमिका घेतली आहे.

Daya Shankar Tiwari : नागपुरात उत्सवांच्या काळात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयावर भाजपच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
आता भाजपचे नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी डीजे बंदीला विरोध करत आक्रमक भूमिका घेतली आहे. “आम्ही डीजे वाजवणारच”, असे विधान दयाशंकर तिवारी यांनी केले आहे. तसेच पोलिसांनी गुन्हा दाखल केला, तरी तो स्वीकारू, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. मात्र डीजे मर्यादित आवाजात वाजवला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
नागपुरातील डीजे बंदीच्या निर्णयावर बोलताना तिवारी म्हणाले, “थेट कोर्टात जाणार नाही. आधी पोलीस आयुक्तांसोबत बोलणार. कारण त्यांनी आदेश काढला आहे. ज्यांनी निर्णय घेतला आहे, त्यांच्याशी आधी चर्चा झाली पाहिजे. त्यातून काही मार्ग निघाला नाही, तर पुढे जाऊ.” यावेळी त्यांनी इतर शहरांमध्ये डीजेला परवानगी असल्याचा मुद्दाही उपस्थित केला. “मुंबईत डीजे आहे, पुण्यात डीजे आहे, महाराष्ट्रात डीजे आहे, मग नागपुरात का नाही?” असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, डीजे बंदीच्या मुद्द्यावर भाजपमध्येच वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळत आहेत. भाजपचे माजी आमदार संदीप जोशी यांनी नागपुरात डीजे बंदीला सर्वप्रथम विरोध दर्शवला होता. त्यानंतर आमदार प्रवीण दटके आणि शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनीही आपापली भूमिका मांडली आहे.
आमदार प्रवीण दटके यांनी डीजे बंदीला सरसकट विरोध केलेला नसला, तरी नियमांच्या अंमलबजावणीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. डीजेवर बंदी घालण्यास विरोध नाही, मात्र हिंदू सणांच्या काळातच अशी बंदी का? असा सवाल दटके यांनी केला आहे.
गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात डीजेचा वापर केला जातो. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो. मोठ्या आवाजाचा लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्यातील विविध भागांतून डीजेच्या आवाजावर निर्बंध घालण्याची मागणी होत आहे. अशा परिस्थितीत नागपुरातील डीजे बंदीचा निर्णय आणि त्याला भाजप नेत्यांकडून होत असलेला विरोध यामुळे हा मुद्दा आगामी काळात आणखी तापण्याची शक्यता आहे.
Gandhari Movie Review: ‘गांधारी’मध्ये तापसीचा अॅक्शन अवतार भावला; पण आई-मुलीचं नातं मनाला भिडलं नाही





