‘दहशतवादाला पाताळात गाडून टाकू’ – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

किश्तवाड – जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचा फैलाव करण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, आम्ही दहशतवादाला पाताळात गाडून टाकू. तो पुन्हा डोके वर काढणार नाही याची निश्चिती आम्ही करू, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी बोलून दाखवला.
विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जात असणाऱ्या जम्मू-काश्मीरातील किश्तवाडमध्ये भाजपच्या प्रचारासाठी शहा यांची सभा झाली. त्यावेळी त्यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनाही लक्ष्य केले.
नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेस हे पक्ष दहशतवाद्यांच्या मुक्ततेची भाषा करत आहेत. मात्र, केंद्रात मोदी सरकार आहे. दहशतवादाला पुनरूज्जीवन देण्याची कुणात ताकद नाही, असा इशारा त्यांनी दिला.
जम्मू-काश्मीरमधील निवडणूक दोन शक्तींमध्ये आहे. एका बाजूला नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी आहेत. तर, दुसऱ्या बाजूला भाजप आहे. आमच्या आघाडीची सत्ता आल्यास राज्यघटनेचे कलम ३७० पुन्हा लागू करण्याची ग्वाही नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेस पक्ष देत आहेत.
ते कलम पुन्हा लागू झाल्यास भाजपने पहाडी आणि गुज्जरांना दिलेले आरक्षण हिरावले जाईल. पण, चिंता करू नका. जम्मू-काश्मीरमधील स्थितीवर मी लक्ष ठेऊन आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेसची आघाडी जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करू शकणार नाही, असा दावा शहा यांनी केला.





