Nashik News : आम्हीपण झाडे कशी तोडतात ते पाहू, मनसेचा सरकारला थेट इशारा

नाशिक : साधुग्रामच्या नावाखाली शासकीय यंत्रणेने खोटा विकास व जमीन लाटण्यासाठी वृक्षांचा बळी देण्याचा घाट घातला असून सरकार जर वृक्षतोडीवर ठाम असेल तर आम्ही देखील झाडे कशी तोडली जातात ते पाहू, असा थेट इशारा शनिवारी मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला. यावेळी तपोवनच्या बाहेर मनसेच्या वतीने आंदोलन करताना जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
तपोवनमधील ५४ एकर क्षेत्रात साधुग्रामची उभारणी आणि ३५ एकर क्षेत्रात प्रदर्शनी केंद्र (माईस हब) करण्याचे नाशिक महानगरपालिकेने नियोजन होते. त्यासाठी चिन्हांकित १८२५ पैकी एक हजारच्या आसपास झाडे तोडावी अथवा पुनर्रोपण करावे लागण्याचा अंदाज देण्यात आला होता. त्यास पर्यावरणप्रेमी, नागरिक, विविध संघटनांसोबत राजकीय पक्षांकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. वाढत्या विरोधामुळे प्रदर्शन केंद्राच्या निविदेला स्थगिती दिली जाणार असल्याचे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केले होते.
अमेय खोपकर यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील व पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय श्रृंगारपुरे, संतोष जुवेकर आणि स्थानिक पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी खोपकर यांनी झाडांवर मारलेल्या फुल्यांवर आक्षेप घेताना प्रशासनावर ताशेरे ओढले. ते म्हणाले की, मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलेल्या पुनर्रोपणावर कुणाचा विश्वास नाही.
मनसे तपोवनातील झाडाच्या फांदीला देखील हात लावू देणार नाही. सरकारनेच साधू-महंतांच्या निवासाची पर्यायी व्यवस्था उभारावी. ज्या ठिकाणी 15 हजार झाडे लावण्याची तयारी केली होती, त्याच जागेचा वापर करावा. माईस हब अंतर्गत पाच लाख चौरस फूट प्रदर्शन केंद्र, रेस्टॉरंट व सभागृह बांधणे नियोजित होते. यामागे हे क्षेत्र निवासी करून खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.





