पुणे जिल्हा | ऊस आणि पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावणारा आमदार हवा

पळसदेव, (वार्ताहर) – राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहे. राज्यात निवडणुकीसाठी आचारसंहिता देखील लागू झाली आहे. अनेकांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर केलं आहे; मात्र नेमकं आमदार झाल्यावर जनतेसाठी काय करणार.
काय काय कामं मार्गी लावणार, याबाबत अद्याप अनेक इच्छुक उमेदवार स्पष्ट बोलायला तयार नाहीत; मात्र इच्छुक उमेदवार बोलत नसले तरी जनता मात्र विविध माध्यमांद्वारे आपले विचार व्यक्त करत आहे. या वेळी उजनी धरणग्रस्तांचे प्रश्न व उसाचा प्रश्न मार्गी लावणारा आमदार हवा असा सूर जनतेचा असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
उजनी पट्ट्यात धरणग्रस्त नागरिकांचे प्रश्न गेल्या 44 वर्षांपासूनचे प्रलंबित आहेत. पुनर्वसित गावांना गावाच्या विस्तारानुसार गावठांची जागा नाही, आवश्यक तेवढ्या मूलभूत सुविधा नाहीत, अनेकांचे पर्यायी जमिनीचे प्रकरणे आजही प्रलंबित आहे. धनरणग्रस्तांना आजही हक्काच्या पाण्यासाठी दरवर्षी संघर्ष करावा लागतो.
याकडे गेल्या 44 वर्षांत झालेल्या लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन काम केलं नाही. हे प्रश्न आजही जसेच्या तसेच आहेत. या प्रश्नावर केवळ राजकीय भाषणे होतात मात्र स्थिती जशीच्या तशीच आहे.
इंदापूर तालुक्यात चार साखर कारखाने असूनही तालुक्यातील शेतकर्याच्या उसाला योग्य भाव मिळत नाही. उसाचे बिल वेळेवर मिळत नाही, कामगारांना वेळेवर पगार मिळत नाही. त्यामुळे शेतकर्याचे व कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
तरी देखील आजी माजी लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न आजही झुलत ठेवला आहे. केवळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून जनतेची दिशाभूल करून वेळ मारून नेण्याचा कार्यक्रम राजकीय मंडळींनी आज पर्यंत केला आहे.
तालुक्यातील बहुतेक राजकारण व अर्थकारण उसावर अवलंबून असताना देखील ऊस बागायतदार दुर्लक्षित राहिला आहे. आज या त्रासाला कंटाळून ऊस उत्पादक शेतकरी उसापासून परावृत्त व्हायला लागला आहे.
तरी देखील ही मंडळी आपल्याच मस्तीत दंग आहे. आता निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जातील. प्रचाराचा धुरळा उडेल.
एकमेकावर आरोपाच्या फैरी झाडल्या जातील. आजपर्यंत हेच झालं आणि निवडणूक संपली कि पुन्हा तेच दिवस जनतेला बघावे लागणार त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आमच्या या दोन्ही प्रश्न योग्य न्याय देणाराच आमदार असावा, अशी भूमिका अनेक सुज्ञ मतदार व्यक्त करत आहेत.





