WCL 2025 : भारत-पाक सेमीफायनल रद्द होणार? असं झाल्यास फायनलमध्ये कोणता संघ पोहोचणार?

WCL 2025 Semifinal India Champions vs Pakistan Champions : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. भारताने पाकिस्तानवर पूर्णपणे बहिष्कार टाकला असून, याचा परिणाम डब्ल्यूसीएल 2025 मध्येही दिसून आला. ग्रुप स्टेजमधील भारत-पाकिस्तान सामना काही भारतीय खेळाडूंनी नाव मागे घेतल्याने रद्द झाला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. आता सेमीफायनलमध्ये पुन्हा एकदा इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स आमनेसामने येणार आहेत. पण हा सामना खरंच होणार का? चला, जाणून घेऊया सविस्तर.
भारत-पाक सेमीफायनल सामना रद्द होणार?
डब्ल्यूसीएल 2025 मध्ये 6 संघांनी भाग घेतला. ग्रुप स्टेजनंतर गुणतक्त्यातील पहिल्या चार संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरले. गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर असलेला संघ चौथ्या क्रमांकाच्या संघाशी, तर दुसऱ्या क्रमांकाचा संघ तिसऱ्या क्रमांकाच्या संघाशी खेळणार आहे. पाकिस्तान चॅम्पियन्सने 5 पैकी 4 सामने जिंकून गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावलं, तर इंडिया चॅम्पियन्सने 5 पैकी 1 सामना जिंकून चौथ्या स्थानावर स्थान मिळवलं. त्यामुळे सेमीफायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. हा सामना रद्द झाला तर फायदा पाकिस्तानला होईल. कारण पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
काय आहे कारण?
मात्र, पाकिस्तान चॅम्पियन्सचे मालक कामिल खान यांनी सांगितलं की, हा सेमीफायनल सामना टाळला जाऊ शकतो. जर भारतीय खेळाडूंनी पुन्हा पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला, तर इंडिया चॅम्पियन्सचा सामना ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स किंवा साऊथ आफ्रिका चॅम्पियन्सशी होऊ शकतो. गुरुवारी होणाऱ्या डब्ल्यूसीएल सेमीफायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास भारतीय खेळाडूंनी नकार दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी बुधवारी आयएएनएसला दिली. कारण ग्रुप स्टेजमधील सामना रद्द झाल्यानंतर सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्यासह माजी भारतीय क्रिकेटपटूंनी जाहीरपणे जाहीर केले होते की ते पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सहभागी होणार नाहीत.
हेही वाचा – Gautam Gambhir : गंभीरशी वाद घालणाऱ्या क्युरेटरला आकाश चोप्राने पाडलं उघड, VIDEO शेअर करत बोलती केली बंद
फायनलमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले तर?
जर इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांनी आपापले सेमीफायनल सामने जिंकले, तर आयोजकांसमोर मोठी अडचण निर्माण होईल. फायनलमध्येही भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यास, गुणतक्त्यात अव्वल स्थानावर असलेल्या पाकिस्तान चॅम्पियन्सला विजेता घोषित केलं जाऊ शकतं. पण यामुळे आयोजकांचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – Abhishek Sharma : अभिषेक शर्माने रचला इतिहास! सामना न खेळताच बनला नंबर वन
काय होणार पुढे?
भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणावामुळे क्रिकेटच्या मैदानावरही अनिश्चितता आहे. सेमीफायनल आणि फायनलचं भवितव्य काय असेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. आयोजक या परिस्थितीचा कसा तोडगा काढतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.





