Wathar Station: वाठार स्टेशनने करून दाखवलं! जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले उपक्रमाचे कौतुक
Wathar Station: निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने आपल्या वयाएवढी झाडे लावून ती जगवावीत; वृक्षप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांचे वाठार स्टेशन येथे प्रतिपादन.

Wathar Station – निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. वाठार स्टेशन येथील वाग्देव महाराज भूमीत यमाई ट्री फाउंडेशनच्यावतीने गेल्या दोन वर्षांपासून यमाई टेकडी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येत असून लावलेल्या रोपांचे संगोपन व संवर्धनही सातत्याने केले जात आहे. त्यामुळे आगामी काळात यमाई टेकडी परिसर हिरवाईने नटलेला दिसेल.
या उपक्रमाचा आदर्श इतर गावांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले. वाठार स्टेशन येथील यमाई देवी मंदिर परिसरात आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वृक्षप्रेमी व अभिनेते सयाजी शिंदे, उप वनसंरक्षक अमोल सातपुते, जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई भोसले, पंचायत समिती सदस्या अनिता भोईटे, कोरेगावचे प्रांताधिकारी प्रमोद कुदळे,
कोरेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रहार जगदाळे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, मंडलाधिकारी रेशमा चव्हाण, अंकुशराव जाधव, सरपंच प्रशासक सीमा चव्हाण, उपसरपंच प्रशासक इर्शाद मोमीन, ग्रामसेवक एस. डी. जाधव, वाग्देव विद्यालय संकुलाच्या प्राचार्य नीलिमा जमदाडे, महसूल अधिकारी व महसूल सेवक, वनपाल सुरेखा जगदाळे, वनरक्षक सुभाष बडदे, अजय कांबळे, चंद्रिका लोहार,
रुपाली परदेशी यांच्यासह यमाई ट्री फाउंडेशनचे सर्व सदस्य, ग्रामस्थ व वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्रातील भूभाग मोठ्या प्रमाणात वृक्षाच्छादित करण्याचे स्वप्न असून ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनात सहभाग घेणे आवश्यक आहे. यमाई देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात.
भविष्यात या भाविकांना झाडांच्या सावलीतून मंदिराकडे जाण्याचा आनंद मिळेल. वाठार स्टेशन ग्रामस्थांनी आणि यमाई ट्री फाउंडेशनने सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. वृक्षप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, झाडे ही केवळ पर्यावरणासाठी नव्हे तर मानवी जीवनासाठी अत्यावश्यक आहेत.
प्रत्येकाने आपल्या वयाएवढी झाडे लावण्याचा संकल्प करावा आणि लावलेली झाडे जगवावीत. निसर्ग आपल्याला मोफत ऑक्सिजन, सावली व जीवनावश्यक साधने देत असतो. झाड म्हणजे आईचे रूप आहे, त्यामुळे निसर्गाचे आपल्यावर असलेले ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.






