Water Tanker: टँकर माफियांना चाप! महापालिकेचा मोठा निर्णय; आता ग्राहकांसाठी येणार नवा नियम
Water Tanker: पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकर पुरवठा पारदर्शक करण्यासाठी पुणे महापालिकेकडून तातडीने 'स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर' (SOP) लागू करण्याचे निर्देश.

Water Tanker : वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा अधिक पारदर्शक, सुरक्षित होण्यासाठी महापालिकेने तातडीने सर्वसमावेशक कार्यप्रणाली म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) तयार करावी, असे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिले आहेत. शहरातील दिवसाआड पाणीकपातीमुळे पाण्याच्या टॅंकरची मागणी वाढली असून अनेक भागात टॅंकर व्यावसायिक मनमानी शुल्क आकारतात.
तसेच वेळेवर पाणीही मिळत नसल्याच्या तक्रारी लक्षणीय प्रमाणात वाढले असल्याच्या नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. ही बाब लक्षात घेऊन ही नियमावली करण्याचे आदेश दिले आहेत. समितीच्या बैठकीत सदस्यांनी पाण्याचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर प्रशासनाकडून टँकर पुरवठ्याची सद्यस्थिती, महापालिका व खासगी टँकरची संख्या, टँकर भरणा केंद्रांची क्षमता, अधिकृत दर, अपघातांची आकडेवारी, चालकांची पात्रता, जीपीएस यंत्रणा, ऑनलाइन बुकिंग व्यवस्था, पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी आणि नियंत्रण कक्षाची माहिती मागविण्यात आली.
कार्यप्रणालीत नेमके काय ?
स्थायी समितीने कार्यप्रणालीमध्ये अधिकृत दरपत्रक जाहीर करणे, प्रत्येक टँकरवर दरफलक लावणे, सर्व टँकरमध्ये जीपीएस बसविणे, नागरिकांना मोबाईल ॲपद्वारे टँकर ट्रॅकिंगची सुविधा उपलब्ध करून देणे, ऑनलाइन व हेल्पलाईनद्वारे पारदर्शक बुकिंग व्यवस्था सुरू करणे, तसेच पहिली मागणी – पहिला पुरवठा हे तत्त्व लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
या शिवाय,टँकरच्या सुरक्षिततेसाठी वेगमर्यादा निश्चित करणे, शाळा व रुग्णालय परिसरात विशेष नियम लागू करणे, चालकांचे नियमित प्रशिक्षण, वैद्यकीय तपासणी, मद्यपान व अमली पदार्थ चाचणी तसेच परावर्तित पट्ट्या, सुरक्षा दिवे, ब्लाइंड स्पॉट मिरर, रिव्हर्स कॅमेरे आणि अलार्म प्रणाली अनिवार्य करण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत.
पाण्याची तपासणीची मागणी
पावसाने ओढ दिल्याने भूजसाठाही घटलेला असून विहिरींचे पाणी कमी झाले आहे. तसेच बोअरवेलही आटल्या आहेत. त्यामुळे, अशा ठिकाणांहून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक टँकरमधील पाण्याच्या नमुन्याची नियमित तपासणी, क्लोरीनेशन, दूषित पाणीपुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई, सर्व खासगी टँकरची नोंदणी, वार्षिक फिटनेस प्रमाणपत्र आणि नियमभंग करणाऱ्यांची काळी यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच नागरिकांच्या तक्रारींसाठी २४x७ हेल्पलाईन सुरू करून २४ तासांत तक्रारींचे निराकरण करणे, पाणीटंचाईग्रस्त भागांसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करणे आणि रुग्णालये, शाळा, पोलीस ठाणी व अग्निशमन केंद्रांना प्राधान्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा अशा सूचनाही समिती सदस्यांनी केल्या आहेत.






