Fire Department : संकटकाळी अधिकारी दिसेनात; अग्निशमन विभागात समन्वयाचा अभाव
Fire Department : महापौर येताच अधिकाऱ्यांची उपस्थिती, पण पहाटेच्या आगीत जबाबदारी घेणारे हात मोजकेच

पिंपरी – कुदळवाडी भंगार गोदामाला मंगळवारी (दि. २३ जून) रोजी पहाटे लागलेल्या भीषण आगीने केवळ अवैध भंगार व्यवसायाचाच प्रश्न ऐरणीवर आला नाही, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागातील अंतर्गत समन्वयाचा अभावही उघड केला आहे.
सुमारे दोन एकर परिसरात पसरलेल्या आगीशी अग्निशमन जवान जीवाची बाजी लावत झुंज देत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.
पहाटे साडेचारच्या सुमारास लागलेल्या या आगीत प्लॅस्टिक, रबर आणि इतर ज्वलनशील साहित्यामुळे आगीने काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केले. शहरातील विविध अग्निशमन केंद्रांमधून जवान आणि बंब घटनास्थळी दाखल झाले.
मात्र, विभागात सहा अधिकारी कार्यरत असताना प्रत्यक्ष घटनास्थळी केवळ एकच अधिकारी नेतृत्व करत असल्याचे समोर आले. त्यामुळे उर्वरित अधिकारी कुठे होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अग्निशमन विभागात नुकतीच भरती झालेली अनेक तरुण पथके कार्यरत आहेत. अशा मोठ्या आपत्तीत त्यांना वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि समन्वय आवश्यक असतो.
खासगी कंपन्या, पीएमआरडीए, एमआयडीसी, पुणे महापालिका तसेच पाण्याच्या टँकरांशी समन्वय साधण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती महत्त्वाची मानली जाते. मात्र, प्रत्यक्षात ही जबाबदारी मोजक्या अधिकाऱ्यांवर पडल्याची चर्चा अग्निशमन वर्तुळात सुरू आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, आगीची माहिती घेण्यासाठी सकाळी महापौर रवी लांडगे आल्यानंतर अनेक अधिकारी तेथे दिसून आले. त्यामुळे “आग विझविण्याच्या वेळी अधिकारी कुठे होते आणि पाहणीच्या वेळी अचानक कसे हजर झाले?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
पोलिसांप्रमाणे यंत्रणा हवी
पोलीस विभागात रात्रीच्यावेळी एक वरिष्ठ अधिकारी कर्तव्यावर असतो. एखादी मोठी घटना घडल्यास त्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्ष देतो. त्यावेळी कर्तव्यावर हजर असलेले आणि नसलेले सर्व अधिकारी घटनास्थळी येतात. तशी कोणतीही व्यवस्था अग्निशामक विभागात नाही.
“अधिकाऱ्यांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे. कुदळवाडी येथील आगीच्या घटनेनंतर हा सावळा गोंधळ प्रकर्षाने पुढे आला आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही मोठ्या घटनेच्या वेळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे घटनास्थळी उपस्थित राहून काम करण्याबाबत कडक सूचना दिल्या जातील.” – व्यंकटेश दुर्वास, उपायुक्त, पिं. चिं. महापालिका (अग्निशामक विभाग)
Pune District : फायरिंग; फरार आरोपी अटकेत, सासवड पोलिसांची कारवाई





