मराठवाड्यात पाण्याची स्थिती बिकट; प्रमुख 11 पैकी 5 धरणांमधील जलसाठा शून्यावर

छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्रातील मराठवाड्यात दिवसेंदिवस पाण्याची स्थिती आणखी बिकट होत आहे. मराठवाड्यातील 11 प्रमुख जलाशयांपैकी पाच जलाशयांमध्ये पाणी शिल्लक नाही, तर सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीत सध्या केवळ चार टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश होतो. गेल्या वर्षी झालेल्या अल्प पावसामुळे या भागातील हे ११ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. यामुळे यातील चार जलाशयातील पाणीसाठा शून्य टक्क्यांवर गेला आहे. मराठवाडा विभागातील सर्वात मोठा जलाशय असलेल्या जायकवाडी धरणात सध्या केवळ तीन टीएमसी (हजार दशलक्ष घनफूट) पाणीसाठा आहे, जे एकूण साठवण क्षमतेच्या केवळ 4 टक्के आहे, असे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालात म्हटले आहे.
सिध्देश्वर (हिंगोली), माजलगाव आणि मांजरा (दोन्ही बीड), निमना तेरणा आणि सीना कोळेगाव (दोन्ही धाराशिव) या पाच जलाशयांमध्ये पाण्याची पातळी शून्य टक्क्यांवर आली आहे. तर निम्न दुधना (परभणी) 6.23, विष्णुपुरी (नांदेड) 15.58, मनार (नांदेड) 22.63, येलदरी (परभणी) 22.6 आणि पेणगाव 6.26 टक्के पाणीसाठा असल्याचे अहवालात म्हटले आहे. या प्रकल्पांमध्ये सध्याचा एकूण पाणीसाठा 11.28 टक्के आहे, जो गेल्या वर्षी याच दिवशी 38.64 टक्के होता.
गतवर्षी जायकवाडी धरणात याच दिवशी ३४.९४ टक्के पाणीसाठा होता. मांजरा धरणाच्या पाणीसाठ्याने तळ गाठलेला असतानाही येथील प्रशासनाकडून पाणी बचतीबाबत कोणतीही पावले उचलली जात नसल्याचे दिसून येत आहे.
सध्या लातूरमध्ये दर चार दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात आहोत. आम्ही डेड स्टोरेजमध्ये जात असलो तरी, आमच्याकडे पुढील 3-4 महिने कोणतीही समस्या नाही. त्यामुळे लातूर शहरात पाणीकपात होणार नाही, असे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.





