प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्यात कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरला असून, रविवारी (दि. २) विदर्भ आणि मराठवाड्यासह कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला, तर अन्य जिल्ह्यात हवामान ढगाळ तर तुरळक ठिकाणी कोरडे होते.ईशान्य अरबी समुद्र व लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्रावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आज इशान्य अरबी समुद्र व लगतच्या भागावर आहे, तसेच पूर्व मध्य बंगालचा उपसागर आणि म्यानमार किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र स्थिर स्थितीत आहे. विदर्भ आणि लगतच्या मराठवाडा भागावर हवेच्या वरच्या थरामध्ये वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्या आधारावर राज्यात पुढील २४ तासांत कोकणात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. आज दिवसभरात रायगड आणि जळगाव जिल्ह्यासह मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात, तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. दरम्यान, आज दिवसभरात मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप दिल्यामुळे कमाल तापमानात किंचित वाढ झाली, तर पुढील दोन दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.