दगाबाज रे…! उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर; थेट शेतकऱ्याच्या बांधावर जात करणार सरकारची पोलखोल

Uddhav Thackeray | मराठवाड्यातील बळीराजा सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडला आहे. मात्र सरकारकडून अद्याप अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. यातच आता बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आजपासून सलग 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. महायुती सरकारला त्यांनी ‘दगाबाज रे’ या शब्दात थेट आव्हान दिले आहे.
सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. आश्वासन देऊन फसवणूक करणारे हे सरकार शेतकऱ्यांसाठी ‘दगाबाज’ ठरले आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. तसेच जाहीर झालेले हजारो कोटींचे पॅकेज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाही. त्यापार्श्वभूमीवर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून, अपुऱ्या आणि विलंबाने मिळणाऱ्या मदतीबद्दल ते सत्ताधारी पक्षांना जाब विचारणार आहेत.
पॅकेजचे काय झाले?
सरकारने घोषित केलेल्या ३१ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय झाले? शेतकऱ्यांपर्यंत खरंच किती रक्कम पोहोचली? अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई म्हणून केवळ ५ रुपये, १० रुपये जमा झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या जखमेवर मीठ चोळण्यासारखा हा प्रकार आहे. तसेच जूनमध्ये कर्जमाफीनंतर आता अतिवृष्टीमुळे कर्जाचे हप्ते कोण फेडणार? असे प्रश्नही ठाकरे गटाने केला आहे. Uddhav Thackeray |
दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधून
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर येथून झाली आहे. ते पैठण, बीडमधील पाली, आणि धाराशिवमधील भूम व परांडा या तालुक्यांना भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार असून, संध्याकाळी धाराशिव, बीड आणि लातूर येथील पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा संवाद दौरा असणार आहे. Uddhav Thackeray |
मराठवाड्यात जोरदार बॅनरबाजी
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून मराठवाड्यात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरमधून महायुती सरकारवर थेट टीका करण्यात आली आहे. या बॅनरवर दगाबाज रे अशा शब्दातून टीका करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे प्रतीकात्मक फोटो लावण्यात आले आहे.
हेही वाचा:





