Khed Water Scarcity: आळंदीतून पाणी बंद होणार? आषाढी वारीच्या तोंडावर ‘या’ गावावर कोसळलं भीषण जलसंकट
Khed Water Scarcity: खेड तालुक्यात मान्सून लांबल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गडद; 19 गावांतील 126 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा, धरणांनी तळ गाठला

Khed Water Scarcity – खेड तालुक्यात अद्यापही समाधानकारक मान्सून पाऊस न झाल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. तालुक्यातील 19 गावांतील 126 वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून तब्बल 30 हजार 151 नागरिकांना 16 टँकर आणि एका ट्रॅक्टरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. विशेषतः चर्होली खुर्द गावातील जलस्रोत पूर्णपणे आटल्याने गावासमोर गंभीर पाणीसंकट उभे राहिले आहे.
एप्रिल महिन्यापासून पाच अधिग्रहित विहिरींमधून 14 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र दिवसेंदिवस वाढणार्या पाणीटंचाईमुळे आता 14 विहिरींचे अधिग्रहण करून 16 टँकर आणि एका ट्रॅक्टरच्या सहाय्याने 19 गावांतील 126 वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. गतवर्षी याच काळात 14 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. मे महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने टँकर बंद झाले होते.
मात्र यंदा पावसाने दडी मारल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली असून ग्रामीण भागातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका पशुधनाला बसत आहे. गायी, म्हशी, शेळ्या व मेंढ्यांसाठी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून पशुपालकांना रानोमाळ भटकत विहिरी, डबकी आणि उपलब्ध जलस्रोतांमधून पाणी आणून जनावरांना पाजावे लागत आहे. अनेक पशुपालकांचा दिवस याच कामात जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
धरणांतील पाणीसाठाही चिंताजनक
1.धरणाचे नाव सध्याचा पाणीसाठा (%) धरणक्षेत्रातील पाऊस (मिमी) गतवर्षी याच दिवशी पाणीसाठा (%)
2.चासकमान धरण 5.90% 58 मिमी 50.29%
3.कळमोडी धरण 16.62% 66 मिमी 100.00%
4.भामा आसखेड धरण 28.30% 40 मिमी 43.02%
या गावांना टँकर
गुळाणी, वाकळवाडी, वाफगाव, पुर, कन्हेरसर, वरुडे, कोहिंडे बुद्रुक, तळवडे, वाळद, वाडा, वाशेरे, टोकावडे, गोसासी, नायफड, चर्होली खुर्द, गाडकवाडी, कोयाळी तर्फे खेड, आव्हाट आणि कडूस-गारगोटवाडी या 19 गावांतील 126 वाड्या-वस्त्यांना 14 खाजगी विहिरींचे अधिग्रहण करून 16 टँकर व एका ट्रॅक्टरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
चर्होली खुर्दसमोर मोठे पाणीसंकट
चर्होली खुर्द गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर पूर्णपणे कोरडी पडल्याने गावावर गंभीर पाणीसंकट निर्माण झाले आहे. टँकर भरण्यासाठी परिसरातील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. तसेच आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीतूनही टँकर भरून पाणी आणले जात होते. मात्र आषाढी वारीसाठी आळंदीत वारकर्यांची गर्दी वाढू लागल्याने येत्या दोन दिवसांत आळंदी नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चर्होली खुर्द ग्रामस्थांसह पंचायत समिती प्रशासनापुढे पर्यायी पाणीपुरवठ्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.





