Junnar Water Scarcity: विहिरी कोरड्या, कूपनलिका आटल्या! जुन्नर पूर्व भागात भीषण चारा टंचाई; शेतकरी संकटात
Junnar Water Scarcity: जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शिंदेवाडी, पेमदरा, वरुंडी, नळवणे आणि आणे परिसरात पाऊस न झाल्याने पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न अत्यंत तीव्र.

Junnar Water Scarcity – जून महिना सरत आला तरीही मूळ मान्सून पावसाचा तपास नाही. पाऊस न झाल्याने जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आणे पठारावरील शिंदेवाडी, पेमदरा, वरुंडी, नळवणे, आणे आसपासच्या गावांमध्ये पाणीटंचाईचे व चाऱ्याचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. अनेक विहिरी, पाझर तलाव, केटी पूर्णपणे कोरड्या पडल्याने नागरिकांसह शेतकरी आणि पशुपालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही तीव्र झाला असून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आनंदवाडी गुळंचवाडी, गुंजाळवाडी, बांगरवाडी येथीलही विहिरी, कूपनलिका, पाझर तलाव आणि लहान-मोठे बंधारे कोरडे पडल्याने भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. परिणामी गावागावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. मात्र वाढत्या उन्हामुळे उपलब्ध पाणीस्रोतांवरही प्रचंड ताण निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, पाण्याअभावी हिरव्या चाऱ्याचे उत्पादन जवळपास बंद झाले आहे. त्यामुळे जनावरांना चारा उपलब्ध करून देणे कठीण बनले असून दूध उत्पादनातही घट होत आहे.
पशुपालकांना जनावरे सांभाळणे आर्थिकदृष्ट्या जिकिरीचे झाले आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे तातडीने चारा छावण्या सुरू करण्याची, टँकरच्या फेऱ्या वाढविण्याची तसेच दीर्घकालीन उपाययोजनांसाठी जलसंधारणाची कामे हाती घेण्याची मागणी केली आहे. आगामी काळात पावसाने हुलकावणी दिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे केवळ तात्पुरत्या उपायांवर न थांबता कायमस्वरूपी जलसाठा निर्माण करणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. “पाणी आणि चारा या दोन्ही मूलभूत गरजांचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात,” अशी एकमुखी मागणी पूर्व भागातील ग्रामस्थांकडून होत आहे.
“चारा छावणी चालू करण्याची मागणी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. तसेच पाण्याची मागणी वाढल्याने टँकरच्या फेऱ्या वाढण्यात यावेत किंवा नवीन टँकर सुरू करावे.”
– प्रियंका दाते, सरपंच, आणे





