Unseasonal Rain : इंदापूर तालुक्यात निसर्गाचे तांडव! वादळी पावसाने हजारो एकर शेतीचे मोठे नुकसान
Unseasonal Rain : भाजप नेते प्रदीप गारटकर आणि प्रविण माने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून तातडीने पंचनामे व नुकसानभरपाई देण्याची मागणी.

Unseasonal Rain – तालुक्यात शुक्रवारी (दि. ५) झालेल्या अवकाळी वादळी पावसाने शिवारात मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजविला असून हजारो एकरांवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. केळी, डाळिंब, ऊस तसेच विविध भाजीपाला आणि फळबागांना मोठा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर आणि भाजप नेते प्रविण माने यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून तातडीने पंचनामे व नुकसानभरपाई देण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
वडापुरी, सुरवड, वकीलवस्ती, शेटफळ हवेली, बावडा, टणू, गणेशवाडी, पिंपरी बु., लाखेवाडी आणि गिरवी परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. अनेक शेतांमधील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या असून डाळिंब बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. तर वाऱ्याच्या जोरदार तडाख्यामुळे ऊस पिके आडवी झाली आहेत. हंगामाच्या उंबरठ्यावर आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.
नुकसानग्रस्त भागात प्रत्यक्ष बांधावर जाऊन गारटकर आणि माने यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती देत तातडीच्या मदतीची मागणी केली. शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेत दोन्ही नेत्यांनी शासनाने त्वरित हस्तक्षेप करून मदत जाहीर करण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, कृषी विभागाने तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी सरसकट मदत आणि योग्य नुकसानभरपाई तातडीने जाहीर करावी. शेतकरी आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे अडचणीत असून या नैसर्गिक संकटामुळे त्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्याचे कृषिमंत्री इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करीत असल्याने तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत मिळाली पाहिजे. शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडलेला आहे.अशा नैसर्गिक आपत्तींमुळे त्याची परिस्थिती अधिकच बिकट होते. त्यामुळे शासनाने संवेदनशील भूमिका घेत तातडीने मदत जाहीर करावी.
– प्रदीप गारटकर, ज्येष्ठ नेते, भाजपा.





