पुण्याच्या पाण्यावर जलसंपदाची व्रकदृष्टी

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महापालिकेकडून पुणेकरांना दिल्या जाणाऱ्या पाणी वापरावर आक्षेप घेत पुन्हा एकदा पाटबंधारे विभागाने महापालिकेस डिवचले आहे. शहरातील लोकसंख्या आणि पाणी वाटपाचे निकष पाळले जात नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाच्या मापदंडानुसार नियंत्रित करण्यासाठी खडकवासला धरणातील जॅकवेलचे (उपसा केंद्र) नियंत्रण जलसंपदा विभागाकडे देण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही दोन वेळा अशी मागणी केली होती.
मात्र, महापालिकेने मागणीला केराची टोपली दाखविली होती. आता महापालिकेकडून शहरासाठीचे पाण्याचे अंदाजपत्रक तयार केले असून, २० टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. त्यामुळे महापालिकेला जादा पाणी द्यावे लागू नये, यासाठी जलसंपदाने दबाब टाकण्यासाठी हे पत्र पाठविल्याची चर्चा आहे.
नागरिकांना पाणी द्यायचे नाही का?
जलसंपदा विभागाकडून नागरिकांना पाणी देताना प्रतिव्यक्ती १३५ लिटर असे पाण्याचे मापदंड निश्चित करून शहरासाठी पाणी कोटा मंजूर केला आहे. प्रत्यक्षात हा कोटा २०११ च्या लोकसंख्येत काही ठराविक वाढ गृहीत धरून मंजूर केला आहे. प्रत्यक्षात गेल्या १४ वर्षांत महापालिकेची भौगोलिक हद्द २५३ चौरस किलोमीटरवरून ५१८ चौरस किलोमीटर झाली आहे.
या वाढीव हद्दीत सर्वाधिक नागरिकरण झालेला भाग महापालिकेत समाविष्ट झाला आहे. त्यामुळे नवीन जनगणना जाहीर झाल्यानंतरच प्रत्यक्षात शहराची लोकसंख्या नेमकी किती, हे समोर येणार आहे. मात्र, पाणी कोटा मंजूर करताना याचा कोणताही विचार केला जात नाही. याशिवाय शहरातील पाणी वितरण व्यवस्था ५० वर्षांहून अधिक जुनी असल्याने त्याला ४० टक्क्यांच्या आसपास गळती आहे. त्यामुळे महापालिकेकडून वापरल्या जाणाऱ्या १८ ते १९ टीएमसी पाण्यातील जवळपास सात ते साडेसात टीएमसी पाणी गळतीमध्येच जाते.
असमान वितरणामुळे प्रत्येकालाच निकषानुसार पाणी देता येत नाही. असे असतानाच दरवर्षी महापालिकेसाठी पाटबंधारे विभागाकडून पाणी कोट्यात वाढ केली जाते. त्यामुळे शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी देण्यासाठी महापालिकेस खडकवासला धरणातून मान्य कोट्यापेक्षा अधिक पाणी उचलावे लागत आहे.
तर पुणेकरांना पाणीच मिळणार नाही
जलसंपदा विभागाने खडकवासला जॅकवेलचा ताबा घेतल्यास महापालिकेस दररोज मंजूर असेल तेवढेच पाणी दिले जाईल. पाटबंधारे विभागाच्या नियोजनानुसार हे पाणी घेतल्यास महापालिकेस केवळ १४.८१ टीएमसी मिळेल. त्यात ३० टक्के गळती गृहीत धरल्यास पुणेकरांना प्रत्यक्षात ९ ते १० टीएमसीच पाणी मिळेल. हे पाणी शहराला सध्या मिळणाऱ्या पाण्यापेक्षा ५० टक्के कमी असल्याने पुणेकरांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे. मात्र, ही बाब माहिती असून, जलसंपदा विभागाकडून यापूर्वी झालेल्या बैठकांच्या चर्चाचा दाखला देत उपसा केंद्रांचा ताबा मागितला आहे.





