Satara News : महू व हातगेघर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Satara News : महू धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाणीपातळीत झपाट्याने वाढ

नीलेश बाबर
सातारा: महू हातगेघर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जावळी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महू आणि हातगेघर धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे दोन्ही धरणांच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
महू धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत असून, विसर्ग सुरू झाल्यास कुडाळी नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीपात्रात प्रवेश करू नये तसेच पुलावरून पाणी वाहत असताना तो ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच हातगेघर धरणाच्या सांडव्यावरूनही पाणी सोडले जाण्याची शक्यता असून, नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी जनावरे, शेती साहित्य व इतर मालमत्ता सुरक्षित ठिकाणी हलवावी आणि सतर्क राहावे, असे प्रशासनाने म्हटले आहे.
महू, टोपेवाडी, पिंपळी, खर्शी बारामुरे, करहर, वालुथ, हुमगाव, आखाडे, बामणोली, सांगवी, कुडाळ, सर्जापूर, कळंबे, उडतारे तसेच हातगेघर व महू धरणाच्या नदीकाठच्या गावांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा:





