Pune News : पुण्यात पावसाचा कहर सुरूच.! सोमवार दुमजली पेठेत वाडा कोसळला
सोमवार पेठेतील धनगर गल्ली येथे दुमजली वाडा अचानक कोसळल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

Pune News : शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी विविध भागांत दुर्घटनांच्या घटना घडल्या. सोमवार पेठेतील धनगर गल्ली येथे दुमजली जुना वाडा कोसळला, घोरपडी गावात मोठे पिंपळाचे झाड सात ते आठ घरांवर पडले, तर पोल्ट्री अंडरपासमध्ये पाण्याचा अंदाज चुकल्याने कार अडकली. अग्निशमन दल आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे तिन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सोमवार पेठेतील धनगर गल्ली येथे दुमजली वाडा अचानक कोसळल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
दरम्यान, घोरपडी गाव परिसरात मुसळधार पावसामुळे मोठे पिंपळाचे झाड उन्मळून पडून सात ते आठ घरांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत झाड हटविण्याचे काम हाती घेतले. या घटनेतही कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पोल्ट्री अंडरपास येथे साचलेल्या पाण्याचा अंदाज चुकल्याने एका कारचालकाचे वाहन पाण्याच्या प्रवाहात अडकले. त्या वेळी तेथे बंदोबस्तावर असलेले पोलीस कर्मचारी पवार आणि पोलीस हवालदार बांबळे यांनी तातडीने धाव घेत चालकाला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांच्या मदतीने सरकारी वाहनाद्वारे अडकलेली कारही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली.
सततच्या पावसामुळे शहरातील सखल भाग, अंडरपास आणि जुन्या इमारतींच्या परिसरात नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





