पुणे जिल्हा | दक्षिण पुरंदरचा पाणीप्रश्न मिटला

परिंचे, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील दक्षिण पट्ट्यातील चार जलाशय तुडुंब भरून वाहत असून वर्षभर पुरेल असा पाणीसाठा झाला आहे. या परिसरातील उपसा सिंचन व्यवस्थापन विभागांतर्गत येणारे पिलणवाडी, माहूर, संगम तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या वडाची मळई जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असून अनेक गावांच्या पाणी योजना व कृषी सिंचन योजनांचा पाणी प्रश्न सुटला आहे.
रुद्र गंगा व केदारगंगा नद्या भरून वाहत असल्यामुळे काठावर असलेल्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. नदीकाठच्या विहिरींच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
पिलाणवाडी जलाशयाची पाणी साठवण क्षमता 67.44 दशलक्ष घनफूट असून 63.82दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. या जलाशयाचा वापरावर सात गावांना पाणीपुरवठा करणारी शिवरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच जेजुरी महावितरण 400 केव्ही योजना अवलंबून आहेत .
या जलाशयाच्या पाण्यावर 399 हेक्टर क्षेत्रावर सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जातो. या जलाशयावर परिंचे परिसरासाठी बंद पाइपलाइन कृषी सिंचन योजना करण्यात आली असून गजानन पाणी वाटप संस्था कार्यान्वित आहे.
माहूर जलाशयाची पाणी साठवण क्षमता 84 दशलक्ष घनफूट असून उपयुक्त पाणीसाठा 64.72 दशरक्ष घनफूट आहे. या जलाशयावर 432 हेक्टर कृषी सिंचन क्षेत्राला पाणीपुरवठा केला जात असून अनेक कृषी उपसा सिंचन योजना या जलाशयावर अवलंब आहेत.
दुर्गम भागातील चार गावांना पाणी पुरवठा करणारी धनकवडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या जलाशयाच्या पाणवठ्यावर आहे. माहूरजाई पाणी वापर संस्था या जलाशयावर कार्यान्वित आहे वर्षभर पुरेल असे पाणी वाटपाचे नियोजन केले जाते.
संगम जलाशय (वीर नाला) पाणी साठवण क्षमता 90.21 दशलक्ष घनफूट असून उपयुक्त पाणीसाठा 69.64 दशलक्ष घनफूट आहे.या जलाशयावर कृषी उपसा जलसिंचन योजना आहेत.पांगारे परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या वडाची मळई जलाशय असून 30.44 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा असून पाणी वितरण व्यवस्थेचे काम बाकी आहे.
रुद्रगंगा व केदार गंगा नद्यांच्या संगमावर वीर नाला असून सर्वात जास्त पाणी साठवण क्षमता असलेला जलाशय आहे. या जलाशयावरुन 382 हेक्टर क्षेत्रावर कृषी उपसा सिंचन योजना सुरू आहेत. रुद्रगंगा नदी मधून वाहून जाणार्या पाण्यातून परिंचे, नवले वाडी परिसरात कोरडे बंधारे भरण्यात येणार आहे. – विनाश जगताप, शाखा अभियंता





