पुणे जिल्हा : पाणीप्रश्न मार्गी लावण्यात कमी पडणार नाही ; रमेश थोरात यांची ग्वाही

यवत : गेली ४० वर्षांपासून मी जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी आणि जनतेची सेवा करीत आलो आहे. मला कशाचीही अपेक्षा नसून शेतकरी आणि सर्वसामान्य दौंडकरांच्या सेवेसाठी निवडून द्यावे. राज्यात सत्ता परिवर्तन निश्चित होऊन महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे.
सत्ता आल्यानंतर मी दौंड तालुक्यातील दुष्काळी गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार आहे. दौंड तालुका पूर्णपणे टँकरमुक्त करू. विकासकामे करायला, मी कुठेही कमी पडणार नाही, हा शब्द देतो, असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांनी दिले.
दौंड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार थोरात यांनी दौंड आणि वासुंदे, हिंगणीगाडा, पांढरेवाडी येथील प्रचार सभेत ते बोलत होते. थोरात यांचा दौरा दौंड शहरांसह जिरायती भागातील हिंगणीगाडा, वासुंदे, पांढरेवाडी, कुरकुंभ, दौंड येथे आयोजित करण्यात आला होता.
थोरात म्हणाले, जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या विकासासाठी आणि हितावह कामासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचे शेतकऱ्याना कर्जवाटप केले आहे. यामध्ये प्रामुख्याने जलसिंचन, शेतीसाठी पाण्याची योग्य व्यवस्थापन व्हावे. दौंड तालुक्यातील शेती सुजलाम सुफलाम व्हावी यासाठी प्रथम पाइपलाइन,
ठिबक सिंचन याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात कर्ज वाटप केले आहे. माझ्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात जनता दरबार भरवून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे कामे केली आहेत. भीमा नदीवर तीन ठिकाणी उड्डाणपुलाची कामे झाल्याने आज दळणवळणचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.
विरोधकांनाही सन्मान दिला
थोरात म्हणाले की, माझे कोणीही निष्ठावंत मर्जीतील कार्यकर्ते नाहीत. मी विरोधक असेल किंवा माझ्याकडील काम घेऊन येणाऱ्याला प्रत्येकाला सामान संधी आणि वागणूक दिली आहे. येणारी प्रत्येक व्यक्ती मग ती विरोधक असला तरीही त्यांचे म्हणणे ऐकून, त्याला सहकार्य करण्याचा प्रयत्न मी आजपर्यंत प्रामाणिकपणे केला आहे.





