पुणे जिल्हा : बारा गावांचा पाणीप्रश्न सोडवू -दिलीप वळसे

केंदूरमध्ये महिला मेळावा
पाबळ – पाबळ केंदूरसह बारा गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी थिटेवाडी धरणाची उंची वाढवणे, खोलीकरण करणे व साठवण क्षमता वाढवण्यासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर असून कामाला सुरुवात होणार असल्याने तसेच वेळ पडली तर कलमोडी धरणातून व थिटेवाडी धरणातून बारा गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यात येणार असल्याची माहिती महायुतीचे उमेदवार, आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली. शिरूर तालुक्यातील केंदूर येथे महिला मेळाव्यात ते बोलत होते.
वळसे पाटील म्हणाले की, निवडणुकीनंतर आपले महायुतीचे सरकार येणार आहे. आपली लढाई शरद पवार यांच्याबरोबर नाही. देवदत्त निकम यांच्याविरुद्ध आहे. काल झालेल्या सभेत सांगितले गेले की, मला ईडीची, इन्कम टॅक्स, सीबीआयची नोटीस आली. त्यातून अटक होईल, यासाठी ते पक्ष सोडून गेले, असा आरोप झाला. मला सायंकाळपर्यंत जरी पुरावा दाखवला तरी मी निवडणुकीतून माघार घेईल, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.
ते म्हणाले की, बारा गावे, लोणी धामणी, आदिवासी भागात गंभीर पाणीप्रश्न आहे, हेच प्रश्न सोडवण्यासाठी पुढची पाच वर्षे काम करायचे आहे. या सर्व विभागातील शेती पूर्ण हिरवीगार झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, या दृष्टीने कामे सुरू झाली आहेत. पण ज्यांच्या जमिनी धरणासाठी गेल्या. त्यांची पहिली काळजी घेण्यासाठी मी काम केले आहे. यात आता या भागातीळ थिटेवडी साठवण साठा वाढवण्यासाठी अडीच कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे विरोधकांना थिटेवडीसाठी कामच राहिले नाही. त्याचे भांडवल करू नका. असा इशारा वळसे पाटील यांनी दिला.
यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव, किरणताई वळसे, सविता बगाटे, जयश्री पलांडे, केशरताई पवार, सविता प-हाड, दीपाली शेळके, सदाशिव पवार, मारुती शेळके, सुभाष उमाप, सचिन वाबळे, केंदूर येथील पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी किरणताई वळसे पाटील, जयश्री पलांडे, सविता बगाटे, कांतीलाल उमाप, आदी पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.
५२ आमदारांनी हा निर्णय घेतला
यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या झालेल्या सभेच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करताना वळसे म्हणाले की, पक्ष सोडण्याचा निर्णय हा सामूहिक होता. त्यामागे विकासकामे करण्यासाठी निधी मिळवणे, हा होता, गेल्या अडीच वर्षात तब्बल सातशे बावीस कोटींचा निधी आणला असून यातून अनेक विकासकामे झाली आहेत. अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. नेतृत्वाची सर्वसामान्याशी बांधिलकी असते. 2772 कोटी रुपयांची विकासकामे सत्तेत सहभागी झाल्याने करता आली, हाच उद्देश सत्तेत जाण्याचा होता इतर काही नाही. ही निवडणूक गद्दारीबद्दल नाही, माझी बांधिलकी तुमच्याशी आहे. मी एकटा नसून ५२ आमदारांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मला त्याची चिंता वाटत नाही.





