Nagar | पावसाळ्यात ३७ गावांतील पाणी दूषित

नगर, (प्रतिनिधी) – पावसाळ्यात नवीन पाणी आल्याने जिल्ह्यातील ३७ गावांतील पाणी दूषित असल्याचे अहवालात आढळले आहे. त्यामुळे या गावांत पाणी शुद्धीकरणाच्या उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील जलस्रोतांची अणुजैविक तपासणी करण्यात येते. जिल्ह्यातील प्रत्येक जलस्रोताचे दर महिन्याला जलसुरक्षा रक्षकामार्फत पाणी नमुने गोळा करून ते तपासणीकरिता जिल्हा प्रयोगशाळेत पाठविले जातात.
पाणी शुद्धीकरण करताना यात क्लोरिनच्या वापराचे प्रमाण ३३ टक्के असणे अपेक्षित आहे. मात्र, ३३ टक्क्यांपेक्षा कमी क्लोरिनचा वापर केल्यास ते पाणी योग्य पद्धतीने शुद्ध होत नाही. त्यामुळे अशा ग्रामपंचायतींना योग्य त्या सूचना दिल्या जातात.
जिल्हा प्रयोगशाळेत पाणी नमुन्यांची तपासणी केल्यावर दूषित नमुन्यांबाबत आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या ॲागस्ट महिन्यातील अहवालानुसार दूषित पाण्याच्या २८८ नमुन्यांपैकी ११ नमुन्यांत क्लोरिनचा २० टक्क्यांपेक्षा कमी वापर संबंधित ग्रामपंचायतींनी केला असल्याचे समोर आले आहे.
पाणी शुद्धीकरणाकडे या ग्रामपंचायतींनी दुर्लक्ष केल्याने त्यांना नोटिसा बजावून, तत्काळ पाणी शुद्धीकरण करून पाणीपुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाकडून दिले जातात.
ऑगस्ट २०२४ च्या अहवालानुसार १ हजार ५८९ पाण्याच्या नमुन्यांची तपासणी झाली. यापैकी ३७ गावांतील ४१ पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे समोर आले आहे.
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दूषित पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी संबंधित गावच्या ग्रामसेवकांना ब्लिचिंग पावडरचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आठवडी बाजाराच्या गावांतही बहुदा पाणी दूषित आढळले.
बाजारहाट करण्यासाठी आजूबाजूच्या खेडेगावांतील नागरिक येतात. त्यामुळे दूषित पाण्यामुळे साथीचे आजार होण्याची शक्यता असते. ग्रामपंचायतींनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
या गावात दूषित पाणी
अकोले : विरगाव, पिंपळगाव निपाणी, खतेवाडी, पैठण., नगर : वाकोडी, मदडगाव, टाकळीकाझी, कोल्हेवाडी, दरेवाडी. नेवासा : खेडले परमानंद, मडके, सुकळी, तेलकुडगाव, देसवडे, देवगाव. पारनेर : देवीभोयरे, अस्तगाव, डोंगरवाडी. पाथर्डी : भवारवाडी, जिरेवाडी,
सोनोशी, घुमटवाडी, अंबिकानगर. राहाता : केलवड. राहुरी : मालुंजे, अंमळनेर, दवणगाव, लाख. संगमनेर : अकलापूर, आभाळवाडी, सादतपूर. शेवगाव : बेलगाव, शहरटाकळी. श्रीगोंदा : देवदैठण, हिंगणी दुमाला. श्रीरामपूर : निपाणी वडगाव, बेलापूर बु.





